Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:01 IST2025-11-28T10:59:52+5:302025-11-28T11:01:48+5:30
Astrology: राहू चुकीच्या वेळी आपल्या राशीला आला तर बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती होते, आज राहूचे नक्षत्र असल्याने त्याचे दुष्परिणाम पाहू.

Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
गोष्ट एका स्त्रीची आहे. तिची राहूची दशा चालू आहे. विवाह अद्याप झालेला नाही. वय पुढे गेले असले तरी विवाह करण्याची इच्छा आहे. राहू तिच्या चतुर्थात (सुखस्थानात) आहे. पत्रिकेतील ग्रहस्थिती अशी की व्यक्ती प्रचंड हायपर (Hyper), ओव्हर अग्रेसिव्ह (Over Aggressive) आहे.
स्वप्न शास्त्र: चांगले स्वप्न पडताच स्वप्नशास्त्रात दिलेले 'हे' नियम पाळा, तरच होईल प्रत्यक्षात लाभ!
कुणाशीही न पटण्याची असंख्य कारणे आहेत. राहुमध्ये जेव्हा गुरूची अंतर्दशा सुरू झाली, गुरू पंचमेश असल्याने आता राहूने त्याची खेळी खेळली. ह्या स्त्रीच्या आयुष्यात कुणी व्यक्ती आली, जिच्या प्रेमात बाईसाहेब इतक्या पडल्या की त्यांना वास्तव, समाज कशाचेही भान राहिले नाही. ह्या व्यक्तीशीच आपला विवाह होणार हे मनोमन जणू त्यांनी गृहीत धरले, नव्हे तसा विचार करायला राहूनेच भाग पाडले. अखेर 'प्यार प्यार होता है', 'प्यार किया तो डरना क्या' वगैरे युक्तीला धरून प्रणयाचे रंग खुलत गेले. राहुमध्ये गुरूचे अंतर संपतांना सगळ्या रंगांचा बेरंग झाला. वास्तव समजले, भानावर आली, तेव्हा लक्षात आले की जसा विचार केला तसे काहीच घडत नाही. ते प्रेम कधीच नव्हते, होते ते फक्त आकर्षण, कारण जितक्या वेगाने तो माणूस ह्या स्त्रीच्या आयुष्यात आला, तितक्याच वेगाने तो निघूनही गेला. विवाहाचे सुख पत्रिकेत नाही, त्यामुळे ह्याआधीही अशा घटना घडल्या आहेत.
राहूची दशा, अंतर्दशा, विदशा काहीही असो, राहू आला की तो ज्या भावात असेल ते भाव ऍक्टिव्ह (Active) होतात आणि तशी फळे मिळतात. राहू सगळ्या लग्नांना, राशींना वाईटच फळे देणार; तो कुणाचाही मित्र नाही. राहूने एखाद्या ग्रहासोबत युती केली की त्यातील गुणांना शोषून त्याला आपल्यासारखे वागायला लावणारा हा तामसी ग्रह आहे. जितका चांगला तितका वाईट. अध्यात्मिक दृष्टीने, संशोधन ह्यासाठी उत्तम, पण फसवणूक, धोका, षडयंत्र ह्यात राहूचा हातखंडा आहे. म्हणूनच, राहूच्या दशेत प्रत्येक गोष्ट, कागदपत्रे आणि माणसेसुद्धा तपासून घ्यावीत. घाईघाईत कुठेही सही करू नये, कुणाला जामीन राहू नये, कुणावरही काडीचाही विश्वास ठेवू नये. स्वतः डोळसपणे प्रत्येक गोष्टीची खात्री करून पुढे जावे. शेअर मार्केट साधे सोपे नाही, तिथेही चढ-उतार आहेत. शेअर मार्केटमध्ये कमी काळात अधिक धन मिळवण्याची हाव धरून आपण सगळेच घालवून बसणार नाही ना हेही पाहावे. जपून पावले टाकावीत. राहूच्या दशेत निव्वळ गैरसमजामुळे अनेक नाती, मैत्रीचे संबंध तुटतात. राहू निव्वळ भास आहे, मोठमोठी वलये आपल्याभोवती निर्माण करणारा आहे, आकर्षणे आपल्याला गुंतवून ठेवतात.
Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!
आज ह्या स्त्रीला राहूने प्रेमाच्या विळख्यात अडकवले आणि तिने तिचे सर्वस्व घालवले. शेवटी हाती आला मनःस्ताप. अनेकदा समजत असूनही व्यक्ती आंधळी होते आणि संकटे ओढवून घेते. विचाराची दिशाभूल करणारा, मती गुंग करणारा राहू आहे. तो आपल्याला विचार करायला संधी, वेळ देत नाही. घटना इतक्या वेगाने घडतात की आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही, नव्हे त्यावेळी आपल्याला तो करायचाच नसतो आणि आपण त्याच्या विळख्यात किती आणि कसे गुरफटत जातो ते आपले आपल्यालाही समजत नाही. आपण त्यातून बाहेर पडतो, तेव्हा असंख्य गोष्टी ओंजळीतून निघून गेलेल्या असतात. राहू आपल्याला पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो. कधीतरी मागच्या कुठल्यातरी जन्मात आपण कुणाचे तरी नुकसान केलेले आहे, मग ते आर्थिक असो अथवा मानसिक त्रास दिलेला असो, ती व्यक्ती ह्या जन्मात कुठल्यातरी रुपात येऊन आपल्यावर सूड उगवणारच, आपल्याला देणे द्यावेच लागणार. हिशोब चुकता.
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!
कलियुगातील राहू हा महत्त्वाचा ग्रह आहे. संपूर्ण इंटरनेट युग राहूचे आहे, पण ह्या सगळ्या चमकत्या दुनियेत आपण कुठे फसले जात नाही ना? ह्याचा विचार केला पाहिजे, सतर्क राहिले पाहिजे. चमकत्या ग्लॅमरचे आकर्षण सगळ्यांना असते, पैसा, प्रसिद्धीची हाव असते, पण त्यासाठी आपण काय पणाला लावत आहोत हे व्यक्तीला समजत नाही. फक्त ती गोष्ट मिळवायची, मग काहीही होऊदे इतकेच समजत असते. तुमची साधना उत्तम असेल, तर तुमचे सद्गुरू तुम्हाला ह्यातून वाचवतील, बाहेर काढतील. वर उल्लेख केलेली स्त्री माझ्याकडे त्याच वेळी आली होती, जेव्हा त्या माणसाशी ओळख झाली होती. मी तिला सतर्क केले होते, पण राहूच्या प्रेमळ विळख्यापुढे आपल्या पामराला कोण विचारतो? राहूच्या दशेत एखादी गोष्ट झाली, तर ती पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कमी असते. ह्यामध्ये तसेच झाले, तो आला आणि निघून गेला. मागे आंधळ्या प्रेमाच्या राहिल्या फक्त आठवणी, त्याही मानसिक त्रास देणाऱ्या.
उपाय: हनुमान चालीसा हा राहूवर रामबाण उपाय आहे. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की, ११ दिवस रोज ११ वेळा हनुमान चालीसा म्हणा. काय आणि कसा फरक पडला, कसा मार्ग मिळाला, कशी कामे होत आहेत ते नक्की कळवा. भोग आपले आहेत, तेव्हा आपल्यालाच हातपाय हलवावे लागणार आहेत. युट्यूबवर लावून हनुमान चालीसा नाही ऐकायची, स्वतः म्हणायची आहे. वेळ नाही? मग भोग वाट्याला आले तर भोगण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यापेक्षा आताच योग्य कष्टी करा... केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!
आज राहूचेच नक्षत्र आहे, म्हणून हा लेखन प्रपंच!
संपर्क : asmitadixit50@gmail.com