आपल्या साचेबद्ध शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण, नोकरी, लग्न, निवृत्ती हा संस्कार आपल्या मनावर बालपणापासून केला जातो. त्यामुळे व्यवसाय करावा हा विचारही मनाला शिवत नाही. मात्र मोठेपणी नोकरी सुरु झाली, कुणी बॉसिंग करू लागले, सहकर्मचारी त्रास देऊ लागले की आपल्यातला व्यावसायिक जागा होतो. पण मानसिक, वैचारिक, आर्थिक आणि शारीरिक तयारी नसल्यामुळे अशी झेप घेणे सगळ्यांनाच जमते असे नाही आणि जे जमवतात त्यांना टिकवता येतेच असे नाही. कारण, नोकरीत कामाचे तास ठरलेले असतात, मात्र व्यवसाय चोवीस तास सुरु असतो. त्यात झोकून देण्याची तयारी ठेवावी लागते, आर्थिक गणिते बसवावी लागतात, नुकसान झाल्यास पुन्हा उभे राहण्याची तयारी ठेवावी लागते आणि दर दिवशी नवनवीन समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यवसायात पैसा दिसत असला तरी त्यामागे करावे लागणारे अपार कष्ट जाणून घ्यावे लागतात.
मात्र, सगळी तयारी दाखवूनही एक प्रश्न उरतोच, आपल्याला व्यवसाय जमेल का?लोक आपल्याकडे येतील का? आपला व्यवसाय वाढेल का? या प्रश्नांवर उत्तर म्हणून ज्योतिष शास्त्रात एक छोटासा प्रयोग सांगितला आहे, तो जरूर करून बघा!
२० सेकंदाचा प्रयोग :
>> एखाद्या दिवशी मधल्या वेळेत कोणत्याही दुकानात जा. जिथे फारशी गर्दी नसेल. >> त्या दुकानात काहीही खरेदी करू नका, फक्त न्याहाळणी करा. >> २० सेकंद दुकानात थांबा. >> जर तेवढ्या वेळात आणखी दोन-पाच किंवा पाच-दहा माणसं दुकानात आली तर समजून जा, तुमचा ऑरा अर्थात तुमचे वलय अतिशय प्रभावी आहे! तुम्ही व्यवसायात स्वतःला आजमावू शकता.
कसा लावावा निष्कर्ष :
>> काही लोक लोहचुंबकासारखे असतात. ते जिथे जातात त्यांच्या अवती भोवती लोक गोळा व्हायला सुरुवात होते. >> हा केवळ स्वभाव गुणधर्म नाही तर व्यक्तिमत्त्वातही चुंबकीय शक्ती असते, ज्यामुळे जमाव तयार होतो. >> हे केवळ मित्र परिवार किंवा नातेवाईकांमध्ये नाही तर अनोळखी ठिकाणीही प्रत्ययास येते. >> हा अनुभव या आधी तुम्ही घेतला असेल किंवा यापुढे घेणार असाल तर २० सेकंदाचा प्रयोग जरूर करा. तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.
व्यवसाय सुरु करताना :
>> हा ज्योतिष शास्त्रीय प्रयोग तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करेल, मात्र नोकरी सोडून व्यवसायात उडी घेताना टप्प्याटप्प्याने प्रवास करा. >> सर्कशीत एका दोरावरून दुसऱ्या दोरावर लटकून जाणारी मुलगी ज्याप्रमाणे दुसरा दोर हाती आल्याशिवाय पहिला सोडत नाही, त्याप्रमाणे आपणही व्यवसायात पार्ट टाइम उतरून स्वतःला आजमावून पाहावे. >> नोकरी असो वा व्यवसाय, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तिथल्या खाच खळग्यांची जाणीव होत नाही.
त्यामुळे व्यवसाय जरूर करा, त्याआधी स्वतःला वर दिलेल्या पद्धतीनेही आजमावून बघा!