Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:26 IST2025-05-07T15:25:16+5:302025-05-07T15:26:31+5:30
Astro Tips: बुध ग्रहाचे स्थान कुंडलीत कुठे आणि कोणत्या राशीत आहे त्यावर अनेक गोष्टी विसंबून असतात; मेष-वृश्चिक बाबतीत तर प्रकरण अवघडच

Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विधात्याने मनुष्याला एक मोठी देणगी बहाल केलेली आहे आणि ती म्हणजे बुद्धी, विचारप्रणाली. बालकाच्या जन्माच्या वेळी ग्रहांच्या ज्या काही अवस्था असतात जसे स्तंभी, वक्री किंवा अस्तंगत तसेच ग्रहांची कमी अधिक गती ही त्या जातकाच्या पत्रिकेवर आयुष्यभर परिणाम करणारी असते. ग्रह मालिकेतील सूर्याच्या समीप असणारा ग्रह म्हणजे बुध . बुधाला त्याच्यातील गुणांवरून लहान बालकाची उपमा दिलेली आहे . बुध पत्रिकेत फलादेश करताना डावलून चालत नाही विशेष करून विवाह जुळवताना शुक्राच्या खालोखाल बुधाचा नंबर लागतो. बुधाची पत्रिकेतील अवस्था आणि गती अनेक गोष्टी निर्देशित करत असते. गुरूकडे ज्ञान आहे तर ह्या ज्ञानाचा आयुष्यात उपयोग कसा करायचा ते काम बुधाकडे सोपवलेले आहे.
एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचे , सारासार बुद्धीचा वापर करून अर्थार्जन कसे करायचे , शाब्दिक खेळ आणि कोट्या तसेच कुटील बुद्धी आणि कारस्थाने ह्यात हातखंडा असलेल्या राहू सारख्या ग्रहासोबत बुध येतो तेव्हा विलक्षण परिणाम करून जातो. पत्रिकेतील बुध हा आत्यंतिक महत्वाचा आहे. माणूस कशाप्रकारे विचार करू शकतो हे त्यावरून समजते. मज्जासंस्था, मेंदू बुधाकडे आहे, लेखन कौशल्य, संवाद, गणित सर्वेसर्वा बुध आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
बुध दुषित, वक्री असेल तर तोतरे बोलणे, जीभ जड असणे , बोलण्यातील सर्व दोष दिसून येतात . पत्रिकेतील बुधाच्या मिथुन आणि कन्या ह्या दोन राशी जिथे आहेत त्या भावासंबंधी काहीतरी अनिष्ट फळ हे मिळतेच. सप्तमेश बुध वक्री , स्तंभी अस्तंगत असेल तर विवाह ठरताना अडचणी येतात , पत्रिकेतील स्तंभी बुध हा भावासंबंधी विचित्र फळ देताना दिसतो.
ह्या बुधाशी जेव्हा चंद्राचा कुयोग असतो तेव्हा स्वभावात चांचल्य , त्वचेचे आजार दिसून येतात . बुधाच्या लग्नांना बुध वक्री असेल तर मानसिक दृष्टीने व्यक्तीला काहीतरी समस्या असतात. बुध दुषित असेल तर एकंदरीतच मनुष्याला मानसिक दौर्बल्य असते. वक्री बुध मेंदूचे विकार देतो. चंद्र बुधाचा षष्ठ भावाशी संबंध आला मंगळ सुद्धा दृष्टीत युतीत असेल तर कोडाचे डाग येऊ शकतात. बुध वक्री असताना रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण अधिक असते .
मेष राशीतील बुध हा बोलण्यातील अति धाडसी वक्तव्य किंवा अति स्पष्टपणा ह्यामुळे गोत्यात आणणारा असतो. असे लोक चलाख पण चंचल असतात . कुरापती काढून भांडत राहणे हा त्यांचा स्वभाव असतो . शाब्दिक चकमकी , टीका , खोचून टोचून बोलणे ह्यात त्यांचा हातखंडा असतो. मेष जातक जे काही आहे ते स्पष्ट तोंडावर बोलून मोकळे होतात . आपले मत परखडपणे मांडतात , निडर असतात . मेष रास ही काल पुरुषाच्या कुंडलीत डोक्यावर येत असल्यामुळे प्रामुख्याने मेंदूचे विकार , फिट्स येणे , विकृती , अपंगत्व दिसून येते . त्यांच्या मनासारखे झाले नाही तर तिरस्काराची , द्वेष , चिडखोर , अहंकारी वृत्तीचे असतात त्यामुळे मानसिक तणावाखाली आयुष्यभर असतात आणि त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत . आत्मघातकी वृत्ती आणि जीवन संपवावे अशा विचारांना खत पाणी घालणारा हा बुध आहे . मेष राशीतील बुध हर्शल प्रतिकूलच . कित्येक कुंडल्यात मेष राशीतील बुध इतकी वाईट फळे देताना दिसत नाही हेही अभ्यासकांनी लक्ष्यात घ्यावे . उत्तम बुद्धी सुद्धा हा बुध देतो. मेष राशीतील बुधाबद्दल बोलताना मंगळ कुठे आहे तेही बघितले पाहिजे .
बुध हा पत्रिकेत सर्वप्रथम तपासावा मग जातकाचा प्रश्न काहीही असो. थोडक्यात बुध बिघडला तर शारीरिक समस्या पेक्षा मानसिक अनारोग्य , बोलण्यात दोष, बुद्धी तल्लख नसणे , झोपेचे विकार , मेंदूचे आजार अश्या अनेक समस्या उद्भवतात . मंगळाच्या दोन्हीही राशीतील बुध त्रासदायकच . चंद्र बुध , राहू बुध , केतू बुध , शनी बुध ह्या युती सुद्धा अभ्यासण्या सारख्याच आहेत . जेव्हा जेव्हा आपल्याकडे मेष राशीतील बुध असलेली पत्रिका येते तेव्हा सखोल सर्वांगीण अभ्यास केला तर अनेक उत्तरे मिळू शकतात आणि फलादेश अचूक होण्यास मदत होते .
बुध आणि मंगळ ह्यांचे हाडवैर आहे. बुध मंगळाच्या वृश्चिक राशीत फार संकुचित असतो. वृश्चिक राशीत बुध असणारे लोक म्हणजे एक रसायन असतात . त्यांच्या मनाचा थांग पत्ता लागणे कठीण. २५ प्रश्न विचारलेत तर एकाचे उत्तर मिळेल. अनेकदा एककल्ली पणा येतो . चेहऱ्यावर कसलेच भाव न ठेवता समोर बसून राहतील . मनात कोलाहल असतो पण समोरच्या व्यक्तीला पुसटशी शंका सुद्धा येणार नाही .वृश्चिक राशीतील बुध आतल्या गाठीचे व्यक्तिमत्व देतो. ह्या बुधासोबत नेपच्यूनचा कुयोग असेल तर कुठेतरी खुपवेळ शून्यात बघत राहणे , मनात कुढत राहणे . ह्यासोबत चंद्र रवी बिघडले असतील तर मानसिकता पूर्णतः बिघडते .
कपटी वृत्ती,लपवा छपवी करण्याकडे कल असतो. अत्यंत आतल्या गाठीच्या स्वार्थी असतात . मनोवृत्ती अत्यंत क्लिष्ट असते , मनस्वास्थ बिघडवणारा हा वृश्चिकेतील बुध नक्कीच आहे. मानसिक आरोग्य बिघडले की अर्थात शारीरिक बिघडणार हे वेगळे सांगायला नको . हे लोक फार संशयी स्वभावाचे असतात आणि ह्या लोकांची वागणूक गूढ असल्यामुळे ह्यांच्याही बाबत संशय घेतले जातात . चंद्र शुक्र मंगळ बिघडले असतील तर बरेच वेळा आचरण शुद्ध राहत नाही .
पत्रिका समोर आली कि लग्नेश आणि त्याचे बलाबल पहिले कि सर्वप्रथम बुध पाहावा अनेक उत्तरे आपसूक मिळतील.
संपर्क : 8104639230