Astro Tips: यशस्वी व्हायचे असेल तर बायकोला खुश ठेवा; शुक्र करेल धनवर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:08 IST2025-03-05T12:08:26+5:302025-03-05T12:08:53+5:30
Astro Tips: शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे आणि स्त्रियांशी संबंधित आहे, त्यामुळे वैभव प्राप्तीसाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय जरूर करा!

Astro Tips: यशस्वी व्हायचे असेल तर बायकोला खुश ठेवा; शुक्र करेल धनवर्षाव!
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात, मग ती पत्नी असू शकेल, नाहीतर आई, बहिण, मैत्रीण, आजी, आत्या, मावशी किंवा सहकारी. तिचा प्रभाव आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात पडतो. तिचे आयुष्यात असणे, केवळ अस्तित्त्व म्हणून नाही तर आनंदाचे, सौभाग्याचे, मन:शांतीसाठी कारक ठरते. अर्थात आपल्या आयुष्याला पूर्णत्त्व देणारी 'ती' आनंदात असेल, समाधानी असेल, प्रेमळ असेल तरच मनुष्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. यामागे शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. कसा ते जाणून घेऊ.
स्त्री हे नारायणीचे रूप असते. ती जेव्हा स्त्री खऱ्या अर्थाने सुखी असते तेव्हा लक्ष्मीसह नारायण घरात वास करतात. सौभाग्य प्राप्तीसाठी धडपडावे लागत नाही, तर भाग्यलक्ष्मी आपणहून आपल्या घरी चालून येते. यामागे धार्मिक, मानसिक आणि ज्योतिष शास्त्रीय कारणे आहेत.
धार्मिक दृष्ट्या सांगायचे, तर स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले आहे. ती खुश असेल तर घर खुश असते. सगळ्यांच्या आनंदाचा विचार ती करते, झटते. पण ती स्वतःच उदास असेल, नाराज असेल तर घरावर उदास छाया येते आणि त्या घरात कितीही भौतिक सुखं असली तरी ती उपभोगण्याचा आनंद घरच्या सदस्यांना मिळत नाही, कारण गृहलक्ष्मी आनंदात नसते.
मानसिक दृष्ट्या सांगायचे, तर घरात स्त्रियांचा होल्ड असतो. स्त्री असेल तर घराला घरपण येते. तिला उपजतच स्वच्छतेची आवड असल्यामुळे ती घर स्वच्छ ठेवते. स्वच्छ घरात रोगराई होत नाही. मन प्रसन्न राहते आणि तिच्याबरोबरच घरच्यांचेही स्वास्थ्य चांगले राहते. म्हणून तिचे असणे आणि हसणे घराच्या उत्कर्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचे, तर स्त्रीचे प्रतिनिधित्व शुक्र ग्रहाद्वारे केले जाते, हा ग्रह लोकांना संपत्ती, वैभव आणि समृद्धी प्रदान करतो. ज्योतिषशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी शुक्र ग्रह बलवान असणे आवश्यक आहे. तसेच, शुक्र हा ग्रह स्त्रियांशी संबंधित आहे, ज्यांना धन-समृद्धी हवी आहे त्यांनी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये तसेच भाग्याची साथ मिळावी म्हणून स्वतःच्या बायकोला आनंदात ठेवावे.
कालपुरुषाच्या कुंडलीत दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी शुक्र आहे, दुसरे घर संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि कोणत्याही पुरुषासाठी सातवे घर त्याच्या पत्नीचे असते, यावरून हे स्पष्ट होते की शुक्राचा संबंध संपत्तीशी आणि पुरुषासाठी, त्याच्या जीवनसाथी अर्थात पत्नीशी आहे. जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला कोणत्याही प्रकारे त्रास दिला तर दुसऱ्या आणि सातव्या घरातील शुक्र बिघडतो त्यामुळे देवी लक्ष्मीचा अभाव सुरू होतो. घराला उतरती कळा लागते. सौख्य हरवते. आर्थिक स्थिती बिघडते. त्यामुळे घरातील लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी नेहमी आपल्या पत्नीचा आदर करा, त्यामुळे शुक्र ग्रह प्रसन्न होऊन तुमच्या घरावर धनाचा वर्षाव करेल!