Astro Tips: मार्चमध्ये सोशल मीडिया करणार राहू केतूचे काम; स्वामींचे नाव घेत मनाला द्या आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:20 IST2025-03-06T12:19:39+5:302025-03-06T12:20:10+5:30

Astro Tips: मार्चमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे होणारे स्थलांतर मनुष्य जीवनावर चांगले वाईट परिणाम करणार आहे, अशा स्थितीत टिकाव लागण्यासाठी उपाय जाणून घ्या!

Astro Tips: During month of March, social media make conflicts; breath and have faith on Swami! | Astro Tips: मार्चमध्ये सोशल मीडिया करणार राहू केतूचे काम; स्वामींचे नाव घेत मनाला द्या आराम!

Astro Tips: मार्चमध्ये सोशल मीडिया करणार राहू केतूचे काम; स्वामींचे नाव घेत मनाला द्या आराम!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

येत्या काही महिन्यातील ग्रहस्थिती आपली परीक्षा पाहणारी, मानसिकता बिघडवणारी, खऱ्या खोट्याची परीक्षा करायला लावणारी . मनात संभ्रम निर्माण करणारी , असुरक्षित  भावना मनात निर्माण करणारी , शाश्वत जीवनशैली बिघडवणारी , शांत पाण्याच्या डोहात खडा टाकून मानसिक आंदोलने तयार करणारी असणार आहे. सोशल मीडिया त्यात राहू केतूसारख्या दुष्ट ग्रहांचे काम करून कलह निर्माण करणार आहे, अशा स्थितीत मन शांत ठेवण्यासाठी तसेच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहू. 

मनुष्य खूप मिजास करतो. आपण खूप शहाणे आणि आपण सर्व काही करू शकतो, अशा खोट्या भ्रमात आयुष्यभर मस्तीत जगतो . पण एक मस्तक आणि दोन हस्तक त्याला शेवटी त्या शक्तीसमोर जोडायलाच लागतात. परमेश्वराचे अस्तित्व मान्य करण्याशिवाय गत्यंतर नसते, अशी स्थिती निर्माण होतेच, त्यावेळी काय करायला हवे, ते पाहू. 

आपण इतकी प्रगती केली, पण अजून आपल्याला रक्त तयार करता येत नाही, पाऊस पाडता येत नाही आणि थांबवताही  येत नाही. जन्म मृत्यू काहीच आपल्या हातात नाही. कारण सर्वात महत्वाचे पत्ते भगवंताने त्याच्या हातात ठेवले आहेत. तेही आपल्याला दिले असते तर? ते नसताना इतका अहंकार आहे आपल्याला मग सर्वच शक्य झाले असते तर बघायलाच नको होते. आपल्या जीवनाला जसे मृत्यूचे बंधन किंवा सीमारेषा आहे, तशी आपली कृती, विचार, वागणे ह्या सर्वाला वेळोवेळी तो बंधने घालत असतो, आपल्याला मार्ग दाखवत असतो. 

महाराजांचे अस्तित्व मान्य करणे ह्यातच आपले हित आहे. तेच करते आणि करवते आहेत . ज्योतिष शास्त्राला आणि ते कथन करणाऱ्या ज्योतिषाला सुद्धा मर्यादा आहेत. ज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तीची स्वतःची उपासना किती दांडगी आहे त्यावर सुद्धा त्याचे फलित सर्वार्थाने अवलंबून आहे. 

आध्यात्म हे आयुष्याला आकार देते . सामान्य माणसाच्या अवलोकनाबाहेर असलेल्या गोष्टींची उत्तरे आध्यात्म देते . आपल्याला  न सुटलेल्या कोड्यांचे उत्तर “नामस्मरण “ आहे, ह्यात दुमत नसावे. दिवसागणिक नामस्मरण वाढले पाहिजे. सात्विक समाधानाचा स्त्रोत नामातच आहे. मी मी म्हणणाऱ्या आपल्या सारख्यांचे अस्तित्व किती क्षणभंगुर आहे हे आध्यात्म्य दर्शवते. त्याच्या इच्छेशिवाय पान काय सृष्टीतील एकही गोष्ट घडू शकत नाही. 

आपल्या कर्माप्रमाणे आपला जन्म आणि आपले भोग आहेत ज्यात ग्रह, तारे दखल घेणार नाहीत, पण जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर अनेक कठीण प्रसंग किती सुलभ होतात हे अध्यात्म शिकवते. ज्योतिष, खगोल शास्त्र, विज्ञान सर्व आपापल्या जागी कितीही योग्य असले तरी जीवन जगायला, पुढे पाऊल टाकायला लागतो तो विश्वास आणि तो आपल्याला आपले सद्गुरू पाठीशी असतील तर आणि तरच मिळू शकतो. मला कुणी तरी सांभाळत आहे, माझ्या पाठीशी कुणीतरी खंबीर उभे आहे, ही भावना जीवन जगायला पुरेशी आहे.  ऊन पावसात , जीवनाच्या चढ उतारात एका समृद्ध जीवनाकडे मी वाटचाल करणार हा विश्वास देणारे आपले महाराज त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. मला तर नेहमी वाटते, माझ्या पत्रिकेतील १२ घरात गुरूच आहेत आणि तेच माझे जीवन पुढे नेत आहेत इतके पावलो पावली अनुभव त्यांनी मला दिले आहेत.

महाराजांच्या शिवाय जीवन शून्य आहे. अध्यात्म जीवनात आशेचा किरण घेऊन येते आणि मी ते प्रत्येक क्षणी अनुभवले आहे. अध्यात्म जगायला निमित्त होते आणि तेच जगवते ह्याचा पदोपदी अनुभव घेतला आहे. माझा देवावर विश्वास नाही हे म्हणण्यापेक्षा महाराजांचे अस्तित्व मान्य करण्यात शहाणपण आहे. अध्यात्म जगवते , जगण्याची उमेद देते , संकटांशी दोन हात करण्याचे बळ देते आणि मनाला उभारी सुद्धा देते . उमीद पे दुनिया कायम है ह्याची प्रचीती देतेच देते ह्यात दुमत नसावे. 

महाराजांचे अनुभव आले की जो साक्षात्कार होतो तो लक्ष लक्ष दिव्यांनी आपले जीवन उजळून टाकतो . उद्या काहीतरी चांगले घडणार आहे ह्या आशेवर मनुष्य जीवन व्यतीत करतो . सदैव तुमचे चिंतन राहो आणि आमरण वारी घडो हि खुणगाठ प्रत्येकाने आपल्या हृदयाशी बांधून ठेवली पाहिजे आणि त्याचा विसरही पडता नये . 

जसजशी भक्ती वाढते जशी अध्यात्माची गोडी वाढते , प्रचीती मिळाली की जगण्याची उमेद वाढते . जीवनात आनंद निर्माण होतो आणि सद्गुरुचरणी नतमस्तक होतो. आपण सेवेकरी आहोत त्यामुळे सेवा करत राहणे हेच आपल्या हाती आहे त्याचे फळ कधी केव्हा आणि कसे द्यायचे ते ठरवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. आपण कोण ते ठरवणारे ? तो अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे. खरतर काहीतरी हवे आहे म्हणून नाम घेणे हेही उचित नाही. मान्य आहे मनुष्याला प्रपंचात सतत अडचणी संकटे येत असतात आणि अशावेळी तो आपल्या गुरूंच्याच कडे धाव घेणार त्यांचाच आधार वाटणार . पण प्रत्येक वेळी काहीतरी हवे तेव्हा त्यांची आठवण होणे किंवा भौतिक सुखाच्या लालसेने भक्ती करणे हे उचित नाही. आपण जसा श्वास घेतो त्याचप्रमाणे मनापासून त्यांची सेवा करत राहावे हे उत्तम, मग अडचणी असो अथवा नसो.

येत्या काही महिन्यातील ग्रहस्थिती आपली परीक्षा पाहणारी, मानसिकता बिघडवणारी, खऱ्या खोट्याची परीक्षा करायला लावणारी . मनात संभ्रम निर्माण करणारी , असुरक्षित  भावना मनात निर्माण करणारी , शाश्वत जीवनशैली बिघडवणारी , शांत पाण्याच्या डोहात खडा टाकून मानसिक आंदोलने तयार करणारी असणार आहे. मग अशा वेळी उगीच मन सैरभैर करून इथे तिथे धाव घेण्यापेक्षा देवासमोर दिवा लावून रोज शांतपणे आपली ठराविक उपासना जसे कुन्जीका स्तोत्र , हनुमान चालीसा, श्री सुक्त , श्री गजानन विजय ह्यासारखे पौराणिक ग्रंथांचे नित्य पठण करत राहणे योग्य, त्यामुळे मनाची एकाग्रता होण्यास आणि आपल्याकडून विचारपूर्वक कृती घडण्यास मदत होईल. पुढील दोन महिने मोठे निर्णय टाळावेत अगदी विवाह सुद्धा. शक्र वक्री अस्त अशा वेगवेगळ्या स्थितीतून जाणार आहे त्याच सोबत मार्च अखेरीस होणारा मोठा बदल म्हणजे शनीचे मीन राशीत होणारे पदार्पण.

आज सोशल मिडीयाचा प्रचंड पगडा जनमानसावर आहे . सोशल मिडिया म्हणजेच राहू . येतंय न लक्षात? अफवा , निसर्गातील बदल , माणसा माणसातील नातीगोती , व्यवहार, शेअर मार्केट , रोजचे व्यवहार सर्व गोष्टींवर परिणाम करणारी ग्रहस्थिती आहे. प्रत्येक पत्रिकेनुसार ती वेगवेगळी असणार आहे.  घाबरू नका. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.. तेव्हा सगळ्यात आधी आपल्या सद्गुरूंच्या वरचा विश्वास क्षणभर सुद्धा कमी होऊ न देता नामस्मरण आराधना उपासना चालू ठेवायची . अनेक वेळा वेगवेगळी ग्रहस्थिती येते म्हणून काय आपण जीवन जगायचे सोडून देणार का? रोज हजार जप करता  दुप्पट करा , अधिकाधिक करा , अधिकस्य अधिकम फलं.  शेवटी एकच ग्रहांना त्यांचे काम करुदे आपण आपले रोजचे नित्यकर्म करू . कुणाला आठवा शनी आणि कुणाला बारावा हे बघू नका अधिक वेळ महाराजांच्या सेवेत व्यतीत करा . कुणाला कसले प्रश्न विचारू नका प्रपंच आणि परमार्थ पुढचे ते बघतील काय ते  ...सहमत ??

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: During month of March, social media make conflicts; breath and have faith on Swami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.