नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:16 IST2025-09-24T13:16:37+5:302025-09-24T13:16:53+5:30
Ashwin Vinayak Chaturthi September 2025: नवरात्रातील विनायक चतुर्थीचे व्रत आवर्जून करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
Ashwin Vinayak Chaturthi September 2025: अश्विन महिना सुरू झाला आहे. अश्विन महिन्या शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. २२ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्र साजरे केले जात आहे. अश्विन महिन्यात येणारी विनायक चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. नवदुर्गांसह गणेशाची कृपा लाभण्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी विनायक चतुर्थी आहे.
गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात, नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने, स्मरणाने केला जातो.
नवरात्रातील विनायक चतुर्थीचे व्रत कसे कराल?
विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून नित्यकर्मे करावीत. दिवसभर उपवास करावा. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. षोडशोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल, तर पंचोपचाराने गणपती पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत.
‘या’ गोष्टी नक्की कराच
संपूर्ण विनायक चतुर्थी व्रत शक्य होत नसले तरी सकाळी पाच मिनिटे मोकळी ठेवून गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. मनोभावे नमस्कार करावा. प्रार्थना करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. तसेच गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥