पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:51 IST2025-10-03T13:50:37+5:302025-10-03T13:51:34+5:30
Ashwin Shani Pradosh Vrat October 2025: अश्विन महिन्यातील शनि प्रदोष व्रतावेळी अशुभ मानला गेलेले पंचक लागले आहे. व्रत पूजा विधी, शिवशंकर आणि शनिचे प्रभावी मंत्र जाणून घ्या...

पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
Ashwin Shani Pradosh Vrat October 2025: अश्विन महिना सुरू आहे. चातुर्मासातील अश्विन महिन्याला विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्यातील प्रदोष शनिवारी आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. शनिप्रदोष व्रतात शनीदेव आणि महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. अश्विन महिन्यातील शनि प्रदोष व्रतावर अशुभ मानल्या गेलेल्या पंचक योगाचा प्रभाव असणार आहे. पंचक योगात आलेले शनि प्रदोष व्रत कसे करावे, ते जाणून घेऊया...
शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून २८ मिनिटांनी पंचक सुरू होत असून, मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्तर रात्री ०१ वाजून २८ मिनिटांपर्यंत पंचक असणार आहे. यातच शनिवार, ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदोष व्रत आले आहे. शनिवारी प्रदोष व्रत आले की, त्याला शनि प्रदोष म्हटले जाते. अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गुरुचरित्र ग्रंथातही शनि प्रदोष व्रताची माहिती आणि महती आढळून येते. शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते.
शनि प्रदोष व्रत करा, शुभ लाभ मिळवा
प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. यानंतर शनिदेवाची पूजा करावी, शनि चालिसा पठण करावे. पठण करणे शक्य नसल्यास श्रवण करावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते.
दोषमुक्त व्हाल, संकटेही होतील दूर
शनीदेव महादेवांना आपले गुरु मानतात, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांचे पूजन करणे विशेष लाभदायी मानले गेले आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशीही मान्यता आहे. शनिप्रदोष व्रत केल्यास समस्या, संकटे दूर होऊ शकतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शनि प्रदोषाचे पुण्य मिळेल, शिव मंत्रांचा जप करा
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
शनिचे अत्यंत प्रभावी मंत्र
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात्॥, हा शनीचा गायत्री मंत्र आहे. ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥