Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:41 IST2025-10-21T13:34:43+5:302025-10-21T13:41:41+5:30
Ashwin Amavasya 2025: आज अश्विन अमावस्या, महिन्यातील प्रत्येक अमावस्या तिथी पितरांशी संबंधित आहे, पण या तिथीला हे नाव कसे मिळाले ते जाणून घेऊ.

Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
हिंदू धर्मात प्रत्येक तिथीचे विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा आणि अमावस्या यापैकी दोन अत्यंत महत्त्वाच्या तिथी आहेत. पैकी, अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित मानली जाते. पितृपक्षात याच तिथीला श्राद्ध करून पितर आपल्या लोकी परत जातात, अशी श्रद्धा आहे. पण, या महत्त्वाच्या तिथीला 'अमावस्या' हे नाव कसे पडले? या नामकरणामागे दडलेली कथा जाणून घेऊ. आज दिवाळीतली(Diwali 2025) आश्विन अमावास्या(Ashwin Amavasya 2025) त्यानिमित्त जाणून घेऊ या तिथीचे रहस्य!
पौराणिक कथा :
अनादी काळात एक अत्यंत तपस्वी आणि तेजस्वी ऋषिकन्या होती. तिच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की, तिने सशरीर पितृलोकात जाऊन आपल्या पूर्वजांचे (पितरांचे) दर्शन घ्यावे. या इच्छेपोटी तिने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. तिच्या तपामुळे प्रसन्न होऊन पितरगण तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी तिला तिची इच्छा विचारली.
पितरांना पाहताच ऋषिकन्या आश्चर्यचकित झाली, कारण तिने कल्पना केली होती की पितरगण वृद्ध आणि अशक्त असतील. पण, तिने पाहिले की पितृलोकात पितरगण तरुण आणि तेजस्वी दिसत होते, कारण त्या लोकामध्ये वयाचा प्रभाव पडत नाही.
अमावसु पितरांवरील मोह आणि शाप
प्रकट झालेल्या पितरांमध्ये अमावसु नावाचे एक पितर होते, जे अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होते. अमावसु यांचे स्वरूप पाहून ऋषिकन्या त्यांच्यावर मोहित झाली. ज्या कामासाठी तिने तपश्चर्या केली होती, ती मूळ इच्छा ती विसरून गेली.
जेव्हा पितरांनी पुन्हा तिची इच्छा विचारली, तेव्हा ऋषिकन्या अमावसु पितरांना म्हणाली, "माझी इच्छा तुम्ही स्वतः आहात. माझी इच्छा आहे की तुम्ही माझा धर्मपत्नी म्हणून स्वीकार करावा!"
ऋषिकन्येचे हे बोल ऐकून संपूर्ण पितृलोकाला दुःख झाले. पितृ आणि त्यांची संतती यांच्यातील संबंधाची मर्यादा पितर चांगलेच जाणत होते. त्यामुळे त्यांनी त्या नादान ऋषिकन्येला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. पण, कन्या आपल्या हट्टावर ठाम राहिली. तिचा हट्ट पाहून अमावसु पितर क्रोधीत झाले आणि त्यांनी त्या ऋषिकन्येला शाप दिला की:
"तू ना कधी पितृलोकात येऊ शकशील आणि ना तुझी कोणतीही तपश्चर्या कधी सफल होईल."
हे बोलून अमावसुंसह सर्व पितर आपल्या लोकी परतले. त्यानंतर ऋषिकन्येचा मोहभंग झाला, पण वेळ निघून गेली होती.
'अमावस्या' नावाचा जन्म :
या घटनेनंतर, अमावसु यांच्या विद्वत्तेवर आणि त्यांच्या नैतिकतेवरील ठाम भूमिकेवर सर्व पितरगण आणि देवगण खूप प्रसन्न झाले. अमावसु यांनी आपल्या मर्यादा आणि जबाबदाऱ्यांचे पालन केले होते. त्यांच्या या विद्वत्तेचा आणि नैतिकतेचा सन्मान करण्यासाठी देवगणांनी घोषणा केली की, अमावसु यांच्या नावावरून ही तिथी 'अमावस्या' म्हणून पृथ्वीवर प्रसिद्ध होईल.
लक्ष्मीपूजन २०२५ रहस्य: अलक्ष्मी दारिद्र्याची देवी का? लक्ष्मीपूजनाला तिची पूजा का करतात?
या अमावस्येचे महत्त्व सर्वाधिक मानले जाईल. ज्यांना आपल्या पितरांच्या दिवंगत होण्याची तिथी (तारखेची) माहिती नाही, ते सुद्धा याच अमावस्येला आपल्या ज्ञात-अज्ञात पितरांना पूर्ण संतुष्ट करू शकतील.
थोडक्यात, अमावस्या तिथीला अमावसु पितरांच्या नावाने ओळखले जाते. पितृपक्षात पितर या अमावस्येपर्यंत पृथ्वीवर राहून आपल्या संततीकडून नैवेद्य (श्राद्ध भोजन) ग्रहण करतात आणि अमावस्येच्या दिवशी पितृलोकात परत जातात. अमावस्या तिथीला श्रद्धेने पितरांना नमन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व बाधा दूर होतात आणि उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो.