Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला विठोबाला घाला 'या' शब्दात आर्त साद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 07:05 IST2025-07-01T07:00:00+5:302025-07-01T07:05:01+5:30

Ashadhi Ekadashi 2025: आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक, ती कोणत्या शब्दात मारावी याचं मार्गदर्शन संतांनी करून ठेवलं आहे, आपल्याला फक्त उजळणी करायची आहे.

Ashadhi Ekadashi 2025: On Ashadhi Ekadashi, chant the word 'Aart Saad' to Vithoba! | Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला विठोबाला घाला 'या' शब्दात आर्त साद!

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला विठोबाला घाला 'या' शब्दात आर्त साद!

विष्णुदास नामा या कवींनी लिहिलेला अभंग आरती स्वरूपात गेली चारशे-पाचशे वर्षे अखंड गायला जात आहे. तेही साधी सुधी नाही, तर अगदी टीपेच्या सुरात. आजच्या भाषेत सांगायचे तर वरचा सा मिळेपर्यंत, या आरतीचा सूर मनोभावे आळवला जातो.निढळावरी करऽऽऽ ठेऊनि वाट मी पाहे, असा प्रत्येक ओळीतला स्वर मनसोक्त लांबवल्याशिवाय ही आरती पूर्णच होत नाही. गणेशोत्सवात ही आरती सामुहिक रित्या म्हणताना जो आर्त भाव दाटून येतो, की पांडुरंगाला ओ द्यावीच लागते आणि तो या ना त्या रूपात भक्तीभेटीला येतो, असा आपला आजवरचा अनुभव आहे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे, त्यादिवशीही आपण ही आरती म्हणाल तेव्हा तिचा भावार्थ लक्षात घ्या!

येई वो विठ्ठले माझे माऊलिये,
निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहे।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप,
पंढरपुरी आहे, माझा मायबाप।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला,
गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला।
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी,
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी।

या आरतीत विष्णुदास नामा म्हणतात, हे विठाई माऊली, मी कपाळावर हात धरून तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. कोणी येणारा, जाणारा दिसला की त्याच्याबरोबर मी निरोप पाठवत आहे. माझा मायबाप पंढरपुरात राहतो. माझी आर्त सुरात मारलेली हाक ऐकून जणू विठूराया येत आहे. गरुडावर बसून माझा कैवारी माझ्याकडे येत आहे, याचा कोण एक आनंद! विठोबाचे राज्य म्हणजे आम्हाला रोजची दिवाळी आहे. अशा या माझ्या जिवाभावाच्या विठ्ठलाला मी प्रेमाने ओवाळतो आहे.

हा अभंग रचणारे कवी विष्णुदास नामा हे संत नामदेव नव्हे. तर विष्णुदास नामा हे संत नामदेवांनंतर होऊन गेलेले कवी आहेत.  त्यांच्या आणखीही अनेक रचना प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या नावाचा आठव झाल्यावर रचना आठवावी, ती या आरतीचीच!

त्यांच्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसली, तरी या लोकप्रिय आरतीमुळे वर्षानुवर्षे त्यांचे नाव अगदी रसिकतेने गायले जात आहे. आजही प्रत्येक भाविक येई वो विठ्ठले अगदी मनापासून, तालासुरात आळवून आळवून गातो. ही विष्णुदास नामा यांच्यावर झालेली विठ्ठलकृपाच नाही का? 

Web Title: Ashadhi Ekadashi 2025: On Ashadhi Ekadashi, chant the word 'Aart Saad' to Vithoba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.