अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:01 IST2025-09-05T12:59:19+5:302025-09-05T13:01:55+5:30
Anant Chaturdashi 2025: हे मंदिर चहोबाजूंनी पाण्यात आहे. आवर्जून भेट द्यावे, असे हे अनंताचे मंदिर असल्याचे सांगितले जाते.

अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
Anant Chaturdashi 2025: शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत. कारण हा एक वसा अहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. हे व्रत सलग १४ वर्षे करावे लागते. श्रीविष्णूंचे अनंताचे स्वरुप असणारे गोव्यात एक अतिशय देखणे मंदिर आहे. गोव्याला फिरायला जाताना आवर्जून या मंदिराला भेट द्यावी, असे सांगितले जाते.
पर्यटक गोव्यातील अनेक मंदिरांना आवर्जून भेटी देतात. गोव्यातील सावई वेरे येथील अनंत मंदिर किंवा अनंताचे मंदिर आपले वैशिष्ट्य, वैविध्य जपून आहे. या मंदिराची एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. गोव्याला जेवढा अथांग समुद्र लाभला आहे, तेवढीच प्राचीन संस्कृती, परंपराही लाभली आहे. गोव्यात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. ही मंदिरे केवळ संस्कृती, परंपरा यांसाठीच नाही, तर स्थापत्य कलेसाठीही जगप्रसिद्ध आहेत.
सतत दृष्टांत अन् अनंताच्या पाषाण मूर्तीचा शोध
४५० वर्षे पोर्तुगीज राजवट असूनही गोव्याची संस्कृती आजही अबाधित आहे. येथील प्राचीन देवालये आणि त्यांचा इतिहास नेहमीच अचंबित करणारा असतो. असेच एक प्राचीन मंदिर फोंडा तालुक्यात आहे. राज्यातील एकमेव असे श्री अनंत देवस्थान फोंडा तालुक्यातील सावई-वेरे गावात आहे. विशेष म्हणजे या मंदिरात असलेली श्री अनंताची पाषाणमूर्ती ४०० वर्षांपूर्वी सापडली. जवळपास ४०० वर्षांपूर्वी सावई-वेरे येथील नदीकाठी श्री अनंताची पाषाणमूर्ती असल्याचा दृष्टांत तेथील एका गृहस्थाला झाला. सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, सतत होत असलेल्या दृष्टांतामुळे या गृहस्थाने शोध घेण्याचे ठरविले.
विधिवत त्या पाषाणमूर्तीची स्थापना
त्या गृहस्थाने खूप शोधाशोध केल्यावर नदीच्या पलीकडे त्यांना एकमात्र होडी दिसली. सुर्ल गावातील गावकऱ्यांसोबत ते गृहस्थ नदी ओलांडून आले. गावकऱ्यांनी होडीमध्ये शोध घेतला. हाती काहीच लागले नाही. शेवटी होडीतून उतरताना एका व्यक्तीची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या पाषणावर पडली. ते पाषाण होडीचा तोल सावरण्यासाठी ठेवले होते. पाषाण उलटून पाहिले तेव्हा त्यावर शेषनागावर शयनावस्थेत असलेली श्री अनंताची मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मंदिर होईपर्यंत गावातील कुळागारात एका खड्डयात पाणी घालून ती मूर्ती ठेवण्यात आली. मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर विधिवत त्या पाषाणमूर्तीची स्थापना केली गेली.
पुरातन वास्तुचे पुरावे
हे मंदिर चहोबाजूंनी पाण्यात आहे. त्याच्या एकाबाजूला तळी असून मंदिराच्या खांबावर छान कोरीव काम केले गेलेले आहे. तेथील एक घंटेवर ई.स. १७९१ मध्ये जे. वॉर्नर अँड सन्स असे लिहिलेले आढळून येते. सभागृहातील प्रत्येक खांबावर पौराणिक काळातील गोष्टींचे कोरीव काम केले आहे. तिथे असलेल्या सहा खांबांपैकी एकाला चांदीचे वलय दिलेले आहे. कालांतराने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली असली तरी मंदिरात उभ्या असलेल्या कोरीव लाकडी खांबावरून ही वास्तु किती पुरातन आहे, ते दिसून येते.