बाप्पाच्या आशीर्वादाने करा शुभकार्याची सुरुवात; समस्या, अडचणी चुटकीसरशी होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 03:13 PM2023-12-20T15:13:02+5:302023-12-20T15:16:26+5:30

भारतीय परंपरांमध्ये कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी ईश्वराचे नामस्मरण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.

all auspicious work start deddicating to lord ganesha distroyall the obstacles | बाप्पाच्या आशीर्वादाने करा शुभकार्याची सुरुवात; समस्या, अडचणी चुटकीसरशी होतील दूर

बाप्पाच्या आशीर्वादाने करा शुभकार्याची सुरुवात; समस्या, अडचणी चुटकीसरशी होतील दूर

भारतीय परंपरांमध्ये कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी ईश्वराचे नामस्मरण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. प्रामुख्याने कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी गणपती बाप्पाचे नामस्मरण, आराधना करण्याची पद्धत आहे. गणपती बाप्पाला सर्व देवतांमध्ये प्रथमेशाचे स्थान आहे. विघ्नहर्ता, गजानना अशा अनेक नावांनी बाप्पाचे नामस्मरण केले जाते. महत्त्वाच्या कामाला सुरूवात करायची असल्यास श्री गणेशाय नम: असा जप केल्याने आपले कार्य निर्विघ्न पार पडते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंतु हे काम हाती घेण्याआधी शुभ मुहूर्त देखील पाहणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे कोणत्याही मंत्राची सुरूवात ॐ चे उच्चारण करून केली जाते. त्याप्रमाणेच कोणत्याही शुभप्रसंगी, विशेष कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाचे पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे.

श्री गणेशाला विघ्नहर्ता का संबोधले जाते?

गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून संबोधले जाते. गणपती बाप्पा कोणत्याही शुभ कार्यामध्ये येणारे विघ्न दूर करुन ते कार्य पूर्णत्वास नेतो, असे सांगितले जाते. बाप्पाला विघ्नहर्ता ही उपाधी का देण्यात आली, याचे दाखले तुम्हाला पुरणातही आढळतील. रिद्धी-सिद्धी गणपती बाप्पाच्या पत्नी आहेत. शुभ प्रसंगी गणपतीची पूजा केल्याने त्या ठिकाणी  रिद्धी-सिद्धीची वास असतो आणि तुमच्यावर त्यांची कृपा कायम राहते, असा समज आहे. रिद्धी- सिद्धी गणेशाच्या पत्नी आहेत तर शुभ-लाभ ही बाप्पाची मुले आहेत. त्यामुळे शुभ कार्यात बाप्पाची आराधना केल्यास तुमच्या वास्तुमध्ये रिद्धी-सिद्धी सोबतच  शुभ-लाभाची कृपा राहते, अशी मान्यता आहे. 

पुराणातही बाप्पाच्या कथांचा उल्लेख :

कोणत्याही शुभ कार्याप्रसंगी गणपती बाप्पाची आराधना का केली जाते. पुराणातील गणेशाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यात याबाबत काही उल्लेख आढळून येतात. महादेव आणि गणपतीमध्ये घनघोर युद्ध झाले. यामध्ये महादेवांनी त्रिशुळाने गणपतीचे शीर भंग केले. त्याक्षणी देवी पार्वती अत्यंत क्रोधीत झाली. त्यानंतर गणेशाला गजमुख लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पण एका शेवटी आईच्या मनात आपल्या लेकराविषयी काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. माता पार्वतीच्या मनात अनेक प्रश्न घर करत होते. तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला वचन दिले की, या ब्रह्मांडात गणपतीला कोणीही त्याच्या रुपावरुन हिणवणार नाही. याउलट सर्व देवी- देवतांच्याआधी गणेशाची पूजा केली जाईल. यामुळे गणेशाला प्रथमेशाचा मान दिला जातो, तो आजही कायम असल्याचे दिसून येते. 
 
ज्योतिषशास्त्रात गणपतीचे विशेष महत्व :

ज्योतिषशास्त्रात गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे. महाभारतासारख्या महान ग्रंथाच्या रचनेत महर्षी व्यासांना गणपतीने साहाय्य केले. स्कंद पुराणातील कथेनुसार, महादेवाच्या आज्ञेनुसार, पुत्र गणेशाने एका ज्योतिषाचे रुप धारण करून काशी नगरीत भक्तांना सुमधुर वाणीने भविष्य सांगितले. यामुळेच बाप्पाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

ऋग्वेदात, ''न ऋते त्वम् क्रियते किं चनारे'', असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की, गणराया तुझ्या आशिर्वादाशिवाय कोणतेही कार्याची सुरूवात करणे निरर्थक ठरेल. गणपतीचे नामस्मरण केल्याने बाप्पाच्या कृपेने अडचणींवर मात करत पुढे मार्गस्थ होण्यास मदत मिळू शकते. गणपती बाप्पाला बुद्धीची देवता असे म्हटले जाते. तसेच लक्ष्मी सोबतच घरी बाप्पाची पूजा केली जाते. लक्ष्मी ही चंचल असते. तुम्ही मेहनत, कष्टाच्या जोरावर लक्ष्मी प्राप्त करू शकता. पण अशाने लक्ष्मी तुमच्याकडे टिकेल की नाही, याची शाश्वती नाही. परंतु तुमची बुद्धी हे तुमचे खरे धन आहे. बुद्धीचा सदुपयोग करून संपत्तीबरोबर जीवनातील सर्व सुख- सुविधांचा उपभोग घेता येऊ शकतो.

Web Title: all auspicious work start deddicating to lord ganesha distroyall the obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.