Shree Swami Samarth Maharaj: जगभराट सर्वत्र भीतीचे सावट आहे. युद्धाचा प्रतिकूल प्रभाव आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. काही वर्ष आधी सुरू झालेले रशिया-युक्रेनचे युद्ध अद्याप थांबलेले नाही. त्यानंतर इस्रायल पॅलेस्टाइन हमास यांच्यात संघर्ष झालेला पाहायला मिळाला. यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष दिसून आला. जगात अनेक देशांत संघर्ष वाढत असतानाच अमेरिका इस्रायल यांनी इराणवर हल्ले करून युद्ध सुरू केले. १२-१३ दिवसांनंतरही हे युद्ध सुरूच आहे. यामुळे अनेक देश अनेक बाबतीत संकटात सापडले आहेत. या युद्धाची धग अनेक देशांना जाणवत आहे. भारतही यातून सुटलेला नाही. या युद्धामुळे देशात गॅस, इंधन संकट गहिरे झाले. घरापासून देशापर्यंतच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. मात्र, काही वेळेस अशा काही घटना घडतात, तेव्हा मन उद्विग्न होते. बेचैन व्हायला होते. अनामिक भीती मनात दाटून येत असते. काय करावे, काहीच सूचत नाही. आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. परंतु, केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो. सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. अनेकदा मन अशांत, अस्थिर असते, अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारावी, असे वाटते. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा अतूट विश्वास, श्रद्धा कायम ठेवावी.
स्वामींचे शब्द आठवा, मनापासून साद घाला
सारे काही आता संपले. हातातून सर्व काही निसटून जात आहे. आता सर्व काही कोलमडून जाणार, अशी भीती गडद होते. हातातून वाळू निसटावी, अशा सर्व एक एक गोष्टी सुटून जात आहेत, असे वाटत असते, तेव्हा स्वामींना मनापासून हाक मारा. स्वामींचे शब्द आठवा. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगत असतात की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी ठेवण्यास सांगत असतात. तुमचे कर्म तुम्ही करत राहा, फळ कधी मिळेल, याची वाट पाहू नका. काळ सर्व प्रश्नांचे उत्तर आहे.
श्रद्धा आणि सबुरी ठेवा, ही वेळही निघून जाईल
तुम्ही तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. ही वेळही निघून जाईल. जेव्हा तुम्हाला असे वाटत राहते की, एकटे आहात. तेव्हा स्वामी तुमच्या सोबतीला असतात. स्वामी आपली परीक्षा घेत असतात. आपण कोंडीत सापडलेले असतो, तेव्हा स्वामीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अशक्यही शक्य करतात. नवीन संधी देत असतात. असा अनुभव आतापर्यंत हजारो स्वामी भक्तांना आल्याचे म्हटले जाते.
मनापासून हाक मारली, तर स्वामी मदतीला धावून येतात
स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. आयुष्यात अनेक समस्या येत असतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा मनापासून हाक मारली, तर स्वामी मदतीला धावून येतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे म्हटले जाते. परंतु, त्यासाठी स्वामींवर श्रद्धा हवी. स्वामींवर अतूट विश्वास हवा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामी नक्कीच शुभ करतील, असा विश्वास कायम मनात असू द्यावा. स्वामींवरील निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : Global conflicts deepen economic woes. Recalling Swami Samarth Maharaj offers solace amidst uncertainty. Have faith; difficult times shall pass. Pray sincerely for help.
Web Summary : वैश्विक संघर्षों से आर्थिक संकट गहराया। स्वामी समर्थ महाराज को याद करना अनिश्चितता के बीच सांत्वना प्रदान करता है। विश्वास रखें; कठिन समय बीत जाएगा। मदद के लिए ईमानदारी से प्रार्थना करें।