६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 20:00 IST2025-11-23T19:58:15+5:302025-11-23T20:00:48+5:30
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ प्रमाणे पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशवासी सज्ज झाले आहेत.

६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
Ayodhya Ram Mandir: अयोध्या नगरी पुन्हा एकदा नवचैतन्याने सजली आहे. संपूर्ण देशासाठी आनंद द्विगुणित करणारा सोहळा होणार आहे. पुन्हा एकदा हजारो विशेष निमंत्रित भव्य सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. अगदी तसाच दिव्य सोहळा पुन्हा एकदा होणार आहे. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरावर ध्वजारोहण करून संपूर्ण राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
संपूर्ण राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत येत आहेत. त्यावेळी हा सोहळा सुमारे ६ ते ८ हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणार आहे. मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे. तसेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे. आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अयोध्येत या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे.
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन
६, ९, ५, २२ आणि २५ तारखांचा राम मंदिराशी मोठा संबंध आहे. या तारखा ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार ठरल्या आहेत. राम मंदिराशी संबंधित ६ डिसेंबर हा दिवस ६ डिसेंबर १९९२ चा आहे. ज्या दिवशी कारसेवकांनी राम मंदिर संकुलात पहिल्यांदा भगवा ध्वज फडकवला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर वादावर निकाल दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराची पायाभरणी केली. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली आणि आता २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदी धर्मध्वजारोहण करून संपूर्ण राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.
राम मंदिरात धर्मध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक विधी
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या धर्मध्वजारोहण कार्यक्रमासाठी अनुक्रमे गणपती पूजन, पंचांग पूजन, षोडश मातृका पूजन केले. त्यानंतर योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन, वास्तुपूजन, नवग्रह पूजन आणि मुख्य मंडळ म्हणून रामभद्र मंडळ व इतर सर्व पूजनीय मंडळांचे आवाहन व पूजन करण्यात आले. विष्णु सहस्रनाम व गणपती अथर्वशीर्ष मंत्र पठनाने आहुत्या देण्याचा विधी झाला.
दरम्यान, २२ जानेवारी २०२४ राम जन्मभूमी मंदिरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा झाली असली तरी या मंदिराच्या आसपासचे बरेचसे काम अपूर्ण होते. आता मुख्य मंदिराच्या आसपासची भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा मंदिर पूर्ण झाले आहे. मंदिर निर्माणाव्यतिरिक्त भाविकांसाठी पूजा प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग, भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्थाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. १० एकरचा पंचवटी भाग जवळपास पूर्ण करत आणला आहे.