१४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी?; विदर्भाच्या पंढरीत उत्सव सुरू, शेकडो दिंड्या शेगावात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:40 IST2026-02-03T11:39:49+5:302026-02-03T11:40:44+5:30
Sant Gajanan Maharaj Prakat Din 2026: गण गण गणात बोते... गण गण गणात बोते... श्री गजानन जय गजानन...

१४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी?; विदर्भाच्या पंढरीत उत्सव सुरू, शेकडो दिंड्या शेगावात
Sant Gajanan Maharaj Prakat Din 2026: विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन जाते. २०२६ मधील श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रकट दिन उत्सव उत्साहात सुरू झाला आहे.
श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सवाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून असंख्य भाविक श्रींच्या दर्शनासाठी संत नगरी शेगाव येथे दाखल होत आहेत. तसेच राज्याच्या विविध भागांतून शेकडो भजनी दिंड्यांचेही आगमन होत असून, संपूर्ण शेगाव नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जात आहे. श्री संस्थानकडून येणाऱ्या भजनी दिंड्यांतील वारकरी व भाविक भक्तांची सर्वोतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानमध्ये भाविक वारकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी श्री संस्थानकडून घेतली जात आहे. यंदा, ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे.
गजानन महाराज उत्सवास उत्साहात सुरू
श्री गजानन महाराज मंदिरात दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. शेगावचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवाला उत्साहात सुरूवात झाली असून, सप्ताहभर चालणाऱ्या या उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. महाराष्ट्रासह देश-विदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत. नित्यनेमाने भाविक सेवा करण्यासाठी जात असतात.
॥ श्री गजानन जय गजानन ॥
॥ गण गण गणात बोते ॥