वडिलांना भेटून निघालेल्या युवकाला अज्ञात वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:40 IST2021-03-26T12:38:47+5:302021-03-26T12:40:46+5:30
राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना चिंचगव्हाण येथील 132 केव्ही उपकेंद्रासमोर सतीशला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.

वडिलांना भेटून निघालेल्या युवकाला अज्ञात वाहनाने चिरडले
माजलगाव : शहराजवळील चिंचगव्हाणजवळ अज्ञात वाहनाने एका 25 वर्षीय तरुणास चिरडल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३० दरम्यान घडली. सतीश संपतराव राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसापुरी कॅम्प येथील रहिवासी सतीश संपतराव राऊत याचे वडील शहरातील माऊली कॉम्प्लेक्स येथे सुरक्षारक्षक आहे. गुरुवारी रात्री तो वडिलांना भेटण्यासाठी माऊली कॉम्प्लेक्स येथे गेला होता. वडिलांना भेटून तो पुन्हा केसापुरी कॅम्प येथील आपल्या घरी परतत होता. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना चिंचगव्हाण येथील 132 केव्ही उपकेंद्रासमोर सतीशला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.