वाहनचालक तरुणाचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:30+5:302021-01-13T05:27:30+5:30
प्रकाश बळीराम गायकवाड (३०, रा. डिग्रस ता. गेवराई)असे मृताचे नाव आहे. प्रकाश हा शहरातील एका व्यापाऱ्याकडे वाहनचालक म्हणून काम ...

वाहनचालक तरुणाचा दगडाने ठेचून खून
प्रकाश बळीराम गायकवाड (३०, रा. डिग्रस ता. गेवराई)असे मृताचे नाव आहे. प्रकाश हा शहरातील एका व्यापाऱ्याकडे वाहनचालक म्हणून काम करत असे. रविवारी सकाळी तो कामाला गेला व सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता त्याला त्याचा मित्र महादेव शिंदे (रा.अंकुशनगर) याने फोन करून 'मला दारू पाज' असे सांगितले. प्रकाश गायकवाड हा महादेव शिंदेला भेटण्यासाठी गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सकाळ होऊनही पती घरी न आल्याने ज्योतीने शहादेव शिंदे या हॉटेलचालकास फोन करून पतीबाबत विचारपूस केली तेव्हा तो हॉटेलमध्ये आला नाही, असे त्याने सांगितले. त्यानंतर मृत प्रकाशचा भाऊ किशोर गायकवाड यास शहादेव शिंदे याने फोन करून अंकुशनगरात प्रकाश गायकवाड मृतावस्थेत आढळल्याची माहिती दिली. घटनास्थळी प्रकाशची दुचाकी आढळली. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह दिसून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास संपविल्याचे आढळले. खुनामागचे कारण अस्पष्ट असून ज्योती गायकवाडच्या फिर्यादीवरून महादेव शिंदे या संशयितावर शिवाजीनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.