"देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:08 IST2025-02-18T14:07:23+5:302025-02-18T14:08:08+5:30
मस्साजोग ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला.

"देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार
मस्साजोग (बीड): मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. अजून एक आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी दिवंगत सरपंच देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई आदि कुटुंबीयांनी खा. सुळे यांच्यासोबत संवाद साधला. देशमुख यांच्या आईने मारेकऱ्यास माझ्या मुलास जसे मारले तशीच शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणत हंबरडा फोडला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते. देशमुख कुटुंबीयांनी हत्येच्या दिवशीच संपूर्ण घटनाक्रम खा. सुळे यांना सांगत एक आरोपी अद्यापही फरार असल्याबाबत संताप व्यक्त केला.
देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी इथे भाषण करायला आलेली नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले आहे. वैभवी कोणाची तरी लेक आहे, मीही कोणाची तरी लेक आहे. आपल्या मूलाचे निधन आईसाठी सर्वांत मोठं दु:ख आहे. मी यापूर्वी माझ्या मावशीच्या मुलाला लहान वयात गमावलं आहे. त्या घटनेला २०-२५ वर्षे झाली असली तरी माझी मावशी आजही सावरू शकलेली नाही."
"माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार"
सुप्रिया सुळे यांनी यावेळी भावनिक होऊन सांगितले की, "या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा देणार आहे. कोण जबाबदारी घेतो किंवा घेत नाही, याची मला पर्वा नाही. माणुसकीच्या नात्याने हा लढा मी थांबवणार नाही." यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागरही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेल
सुळे पुढे म्हणाल्या, "माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रकरणात आठ दिवसांत न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी महाराष्ट्रातील महिला म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेल." देशमुख हत्येप्रकरणात न्याय न मिळाल्यास सत्तेचा उपयोग काय, असा सवाल करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सत्याचाच विजय झाला पाहिजे. सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे.मी कोणाशीही तडजोड करणार नाही." असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेते सुरेश धस यांना टोला लगावला.
"न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"
बीड जिल्ह्याचा अभिमान आम्हाला आहे, पण काही लोकांनी जिल्ह्याचे नाव बदनाम केले आहे. आता महिलांनी पुढे येऊन लढा द्यावा, आवश्यकता पडल्यास लाटणं हाती घ्यावं, असे आवाहन सुळे यांनी केले. तसेच, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचेही सुळे यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला.