पत्नी, एका मुलाला बॅटने मारले, दुसऱ्या मुलास पाण्यात बुडवले; निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:00 IST2024-12-13T13:00:16+5:302024-12-13T13:00:50+5:30

चारित्र्यावर संशयाने पत्नीसह दोन मुलांचा खून, निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा; बीडमधील घटनेट प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा महत्त्वपूर्ण निकाल

Wife, one child beaten and killed with bat, another child drowned in water; Ruthless father sentenced to death | पत्नी, एका मुलाला बॅटने मारले, दुसऱ्या मुलास पाण्यात बुडवले; निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा

पत्नी, एका मुलाला बॅटने मारले, दुसऱ्या मुलास पाण्यात बुडवले; निर्दयी पित्याला फाशीची शिक्षा

बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह दोन मुलांचा खून केला. कोरोना काळात लॉकडाऊन असताना २०२० मध्ये बीड शहरातील पेठबीड भागात ही घटना घडली होती. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने गुरुवारी दिला. यात निर्दयी पित्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आनंद एल. यावलकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

संतोष जयदत्त कोकणे (रा. तकवा काॅलनी, शुक्रवार पेठ, बीड) असे आराेपीचे नाव आहे. तर संगीता संतोष कोकणे (वय ३५), सिद्धेश संतोष कोकणे (वय १०) व कल्पेश संतोष कोकणे (वय ८) अशी मयतांची नावे आहेत. २४ मे २०२० रोजी शुक्रवार पेठ येथील राहत्या घरी पहाटे चार वाजेच्या सुमारास संतोष कोकणे याने संगीता हिचा अनैतिक संबंधाच्या संशयाच्या कारणावरून डोक्यात लाकडी बॅट व दगडाने गंभीर दुखापत करून खून केला होता. त्यानंतर दुसरा मुलगा कल्पेश याच्याही डोक्यात बॅट मारून त्यास बेशुद्ध केले. त्यानंतर पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून मारले होते. या घटनेने जिल्हा हादरला होता. याप्रकरणी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती, हवालदार सुनील अलगट आदींनी केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरील प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग झाले होते. या प्रकरणाचा साक्षीपुरावा व सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आनंद एल. यावलकर यांच्या समोर झाली. यात सर्व बाजू तपासून न्या. यावलकर यांनी आरोपी संतोष याला कलम ३०२ प्रमाणे दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील भागवत एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा शासकीय अभियोक्ता व इतर सर्व अति. सहा. सरकारी वकील यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार माधव नागमवाड व उपनिरीक्षक बी. बी. जायभाय यांनी मदत केली.

१५ साक्षीदार तपासले
सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यात संगीताचे ज्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्याची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच संतोषच्या भावाचा जबाब, इतर साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांचा अहवाल यांचे अवलोकन आणि सहा. सरकारी वकील भागवत एस. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. सदरचे प्रकरण हे दुर्मीळातील दुर्मीळ असून आरोपीस फाशी देणे इतपत गंभीर आहे, हा युक्तिवाद ग्राह्य धरून संतोष कोकणे याला फाशीची शिक्षा सुनावली.

आत्याकडे गेल्यामुळे तिसरा मुलगा वाचला
घटनेच्या दिवशी संतोष व त्याची पत्नी संगीता यांच्यात टोकाचे वाद झाले. त्यामुळे संतोष हा त्याच्या बहिणीच्या घरी मयूर या मोठ्या मुलाला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांनी जेवण करून झोपले व पहाटेच्या दरम्यान संतोष याने घरी जाऊन पत्नी संगीता हिचा खून केला. याचवेळी सिद्धेश व कल्पेश जागे झाले, त्यामुळे त्यांनाही संपवले. मयूर हा आत्याकडे असल्यामुळे वाचला होता. सध्या तो आजीकडे राहत आहे.

खून करून पोलिस ठाण्यासमोर उभा
पत्नीसह दोन मुलांचा खून केल्यानंतर संतोष हा बहिणीकडे गेला. तेथे नाश्ता केला. बहिणीने विचारल्यावर बाहेर फिरायला गेलो आणि तसेच तुझ्याकडे आलो, असे सांगितले. नाश्ता झाल्यावर तो पेठबीड पोलिस ठाण्यासमोर जाऊन उभा राहिला. तोपर्यंत संतोषच्या भावाने घटनास्थळाची पाहणी केल्यावर तो घाबरून पेठबीड पोलिस ठाण्याकडे आला. यावेळी त्याला संतोष हा बाहेर उभा दिसला. त्याला विचारल्यावर सर्व घटनाक्रम सांगितला. मग त्याला भावानेच पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Wife, one child beaten and killed with bat, another child drowned in water; Ruthless father sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.