संशयाने केला घात; माजलगावमध्ये पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:53 IST2019-02-09T11:53:06+5:302019-02-09T11:53:27+5:30
गणेश ढवळे या आरोपीला पोलिसांनी एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.

संशयाने केला घात; माजलगावमध्ये पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मॅनकॉट जिनींगमध्ये आज सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा.शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा ह.मु.माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गणेश ढवळे या आरोपीला पोलिसांनी एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.
उषा व गणेश ढवळे हे दाम्पत्य कामगार आहे. मागील काही दिवसांपासून ते कामासाठी माजलगावला आले होते. शहरातीलच मॅनकॉट जिनींगवर काम करून उदरनिर्वाह भागवित होते. गणेशचा पत्नीवर नेहमी संशय असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करण्याबरोबरच तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. याच संशयातून दोघांमध्ये वाद झाले. यातच गणेशने उषाचा गळा दाबून खून केला. शनिवारी सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली.
याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पतीवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ पथके रवाना केली आणि अवघ्या तासाभरात गणेशच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे.