प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघात दाखविण्याचा बनाव उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:59 IST2018-12-13T18:56:05+5:302018-12-13T18:59:48+5:30
आरोपी पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले.
_201707279.jpg)
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघात दाखविण्याचा बनाव उघडकीस
माजलगांव (बीड ) : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केला. तसेच पतीचा मृत्यू अपघात असल्याचा बनाव केला. परंतु, पोलीसांनी या घटनेचा अवघ्या सहा तासात छडा लावुन खरा प्रकार उघडकीस आणत आरोपी पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतले.
माजलगांव तालुक्यातील शहाजानपुर येथील कावेरी बालासाहेब शिंदे हिचे किट्टी आडगांव येथील रहिवाशी विठ्ठल गुलाब आगे याच्याशी अनैतिक संबंध होते. कावेरी हिची मुलगी ही विवाहयोग्य असल्यामुळे पती बालासाहेब हा तिला वेळोवेळी समज देत असे परंतु कावेरी ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने वारंवार या पती पत्नीमध्ये भांडणे होत असत. मागील चार दिवसांपासुन त्यांच्यात भांडण सुरु होते. यातच कावेरी हिने प्रियकर आगेच्या संगनमताने कट रचला. आज पहाटे एक वाजता बालासाहेब हा शेतात दारे धरण्यासाठी गेला. एक तासांनी त्याची पत्नी व तिचा प्रियकर हे शेतात आले. त्यांनी बाळासाहेब यास मारहाण करत रुमालाने गळा आवळुन खुन केला. यानंतर गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह विद्युत प्रवाह असलेल्या कुंपणावर टाकला.
सकाळी या प्रकार उघडकीस झाला. यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे, एम.डी. वडमारे,रवि राठोड, गोविंद बाबरे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अधिक तपास करत संशयावरून आगेला ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.