बीड : एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण करणारा भाजपचे आ.सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. त्याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खोक्या उर्फ सतीश भोसले गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. पोलीस त्याच्या लोकेशनचा शोध घेत होते. खोक्याचं शेवटचं लोकेशन प्रयागराज मिळालं होतं. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रयागराज पोलिसांशी समन्वय साधून खोक्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यानी दिली.
पोलिस अधीक्षक काँवत पुढे म्हणाले की, आमची टीम प्रयागराज येथे पोहोचत आहे. उद्या किंवा परवा त्याला इथं आणलं जाईल. दुसऱ्या राज्यात अटक असल्यानं आजच ट्रान्झिट रिमांड करुन ताब्यात घेतलं जाईल. खोक्यावर दोन गुन्हे ३०७ चे आणि एक गुन्हा एनडीपीएसचा असल्याची माहिती देखील काँवत यांनी दिली.
काय आहे प्रकरण?बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. यात पोलिसांनी स्वत: तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर लगेच वनविभागाने खोक्याच्या घरी छापा मारून तपासणी केली. या वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले. या सर्व गुन्ह्यांमध्ये खोक्या हा पोलिसांना हवा होता. परंतु, तो पोलिसांना सापडत नव्हता. हाच फरार खोक्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देत होता या सर्व प्रकारामुळे पोलिस करतात काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतू अखेर या खोक्याला बेड्या ठोकलण्यात पोलिसांना यश आले आहे.