वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर न्यायालयात काय झाला युक्तिवाद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:04 IST2025-01-16T19:04:11+5:302025-01-16T19:04:23+5:30
वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी; बीड न्यायालयाबाहेर राडा

वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर न्यायालयात काय झाला युक्तिवाद?
बीड : वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी बीड न्यायालयात हजर केले. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. न्यायालयातून बाहेर घेऊन जात असतानाच महिला वकिलासह इतर काही महिलांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर कराड समर्थकही आक्रमक झाले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या जमावातील काही लोकांना ताब्यात घेतले, तर दुसऱ्या बाजूला खोटे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी परळीत दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला. अनेक समर्थकांनी टॉवरवर चढून आंदोलनही केले.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अगोदरच आठ आरोपी आहेत. त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्यावरही मकोका लावावा, या मागणीसाठी सोमवारी मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मंगळवारी वाल्मीक कराड याला केज न्यायालयात हजर केले. तेथे खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी होताच मकोका लावल्याने सीआयडीने ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याला अगोदर केजच्या न्यायालयात हजर केले. तेथून दुपारी अडीच वाजता बीडमधील मकोका न्यायालयात आणले. त्यानंतर सरकारी वकील व कराडचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेत न्या. सुरेखा पाटील यांनी कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
न्यायालयात काय युक्तिवाद?
दुपारी अडीच वाजता बीडच्या मकोका न्यायालयात कराड याला बंदोबस्तात हजर केले. ३ वाजेच्या सुमारास न्या. सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते. ॲड. कोल्हे यांनी या गुन्ह्यात कराडचा कसा सहभाग आहे, तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन, सीडीआर तपासायचे आहेत, अशा प्रकारचे १० मुद्दे मांडून १० दिवसांची काेठडी मागितली. तर, कराडचे वकील ॲड. ठोंबरे यांनी या हत्याच्या गुन्ह्यात कराड यांचा कसलाही संबंध नाही. अगोदरच १५ दिवस कोठडी घेतलेली आहे. आता परत त्याच प्रश्नांवर काेठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितली, परंतु न्या. पाटील यांनी दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यावर २२ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
महिला वकिलाची घोषणाबाजी
कराड याला न्यायालयातून बाहेर नेत असताना, ॲड. हेमा पिंपळे यांच्यासह इतर महिलांनी घोषणाबाजी केली. तसेच, त्यांनी कराड याला फाशी देण्याची मागणी केली. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असली पाहिजे. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडला भेट द्यावी, अशी मागणी केली. या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कराड समर्थकांचीही घोषणाबाजी
महिला वकिलाच्या घोषणेनंतर पुरुष वकिलांसह इतर समर्थकही आक्रमक झाले. त्यांनी कराड यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. तसेच कराडच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
छातीत दुखले, जेवणही टाळले
कराडाला मंगळवारी रात्री ८ वाजता जिल्हा रुग्णालयात तपासणी करून बीड जिल्हा कारागृहात नेले. छातीत दुखत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली, परंतु त्यानंतर कारागृहात गेल्यावर त्याने जेवण करणेही टाळल्याची माहिती आहे. बरॅक क्रमांक ९ मध्ये त्याचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी देखील त्याची वैद्यकीय तपासणी केली.
समोर बंदोबस्त, मागच्या दाराने नेले
कराडला बीड न्यायालयात आणले जाणार असल्याने समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हे पाहून पोलिसांनी समोर बंदोबस्त लावला, तर न्यायालयाच्या मागील दाराने तिसऱ्या मजल्यावरील मकोका न्यायालयात नेले. त्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने खाली आणून पोलिस व्हॅनमधून बीड शहर ठाण्याच्या कोठडीत नेले. न्यायालयासह परिसरात तगडा बंदोबस्त तैनात होता.