'लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले'; जाब विचारत काकाचा खून, पुतण्याला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:37 IST2025-04-26T16:37:37+5:302025-04-26T16:37:58+5:30
पाच वर्षांनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

'लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले'; जाब विचारत काकाचा खून, पुतण्याला जन्मठेप
बीड : लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले, असे म्हणत सुरी खुपसून मोहमंद शरीफ अबुलगणी कुरेशी (रा. पिंपळनेर) या काकाचा २९ सप्टेंबर २०२० च्या दुपारी ४:३० वाजता खून केला होता. यातील आरोपी पुतण्या फारूक रमजान कुरेशी याला २३ एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी सुनावली.
या प्रकरणात मोहमद शरीफ अबुलगणी कुरेशी हे पिंपळनेर येथील हॉटेलसमोर गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी आरोपी पुतण्या फारूक रमजान कुरेशी तेथे आला आणि म्हणाला, लोकांकडे माझ्याबाबत काय सांगितले असे म्हणून त्याने हातातील लोखंडी सुरी काढून काकाच्या पोटात जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन वार करून जखमी केले. मोहमद मोठ्याने ओरडले असता आरोपी तेथून पळ काढला. त्यांनतर तेथे जमलेल्या लोकांनी मोहमंद यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मयत मोहमद यांनी दिलेल्या मृत्युपूर्व जबाबावरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. उपचारादरम्यान १ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ४.०० वा सुमारास मृत्यू झाला. यानंतर गुन्ह्यामध्ये कलम ३०२ हे वाढवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीने स्वतःहून पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याची माहिती दिली.
अशी सुनावली शिक्षा
या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक डी.पी. सानप यांनी केला. खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. मोहमद यांचा मृत्यूपूर्व जबाब, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा यांचे अवलोकन करून जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी प्रकरणातील आरोपी फारूक रमजान कुरेशी याला दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय दि. राख यांना पैरवी अधिकारी ए.एस. आय नागमवाड, एम. व्ही यांनी त्यांना सहकार्य केले.