माझ्या सिंदूरचे काय? व्यथित ज्ञानेश्वरी मुंडेंचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:46 IST2025-07-16T17:46:04+5:302025-07-16T17:46:23+5:30
पतीच्या हत्येप्रकरणी न्याय न मिळाल्याने पत्नीचे टोकाचे पाऊल

माझ्या सिंदूरचे काय? व्यथित ज्ञानेश्वरी मुंडेंचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन
बीड : पिग्मी एजंट महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासात दिरंगाई होत असल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी भेट झाली. तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे कळवल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर जीपमध्ये बसताना ज्ञानेश्वरी यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दुपारी १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
महादेव मुंडे यांची हत्या १९ महिने पूर्वी झाली होती. आरोपी अद्यापही सापडलेले नाहीत. या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी यांनी वेळोवेळी आंदोलने केली, प्रशासनाची भेट घेतली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांनी पुन्हा एकदा तपास गतीने व्हावा अशी मागणी केली होती. अलीकडेच त्यांनी पोलिस अधीक्षकांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी सतर्कता म्हणून बंदोबस्त ठेवत त्यांची भेट घडवून आणली. चर्चेनंतर समाधान व्यक्त केल्यानंतरही त्यांनी विष प्राशन केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. पंतप्रधानांनी सिंदूर ऑपरेशन राबविले, परंतु माझ्या शिंदूरचे काय? असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडेंनी यांनी उपस्थित करत पोलिस अधीक्षक न्याय देतील, असा विश्वास असल्याचे म्हंटले.
... म्हणून बहिणीचा संयम सुटला
अनेक दिवसांपासून बहिण तणावात आहे. एकीकडे मुलांचे शिक्षण, घरची जबाबदारी आणि दुसरीकडे संथ पोलीस तपास यामुळे बहिणीचा संयम सुटला. पोलीस अधीक्षकांनी तपास एलसीबीकडे वर्ग केला असल्याची माहिती आहे. अधिवेशनात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी दिली.