कुटुंबासह नाशिकला देवदर्शनासाठी गेले, चोरट्यांनी घरफोडून साडेतीन लाखांचा ऐवज पळवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:12 IST2024-12-19T16:10:40+5:302024-12-19T16:12:31+5:30
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले दोन चोरटे; मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून केला घरात प्रवेश

कुटुंबासह नाशिकला देवदर्शनासाठी गेले, चोरट्यांनी घरफोडून साडेतीन लाखांचा ऐवज पळवला
परळी: शास्त्रीनगरमध्ये राहणारे अनिल मुंडे हे कुटुंबासह नाशिक येथे देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधून दोन चोरट्यांनी घरफोडी करत 3 लाख 45 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना 17 डिसेंबर रोजी पहाटे घडली. याप्रकरणी मुंडे कुटुंब परत आल्यानंतर 18 डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील शास्त्रीनगर भागात अनिल श्रीधरराव मुंडे यांचा बंगला आहे. मुंडे कुटुंबासह १३ डिसेंबर रोजी नाशिक येथे देवदर्शनासाठी गेले. दरम्यान, 17 डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता अनिल मुंडे मोबाइलवर घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत होते. यावेळी कुलूप तोडून दोघे घरात प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर 18 डिसेंबर रोजी मुंडे कुटुंबासह परळी येथे परतले. तेव्हा त्यांना दरवाज्याचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट फोडलेले आढळून आले.
मुंडे यांनी तपासणी केली असता कपाटातील एक लाख 42 हजार रुपये किमतीचे सोनेचांदीचे दागिने व रोख दोन लाख तीन हजार रुपये असा एकूण तीन लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरीस केल्याचे आढळले. मुंडे यांच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवार व जमादार अंकुश मेंडके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवार हे करत आहेत.