परराज्यातील २९ ऊसतोडणी मजुरांचे आठवडाभर अन्नाविना हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:45+5:302021-03-14T04:29:45+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : मध्य प्रदेशातील २९ ऊसतोड कामगारांची सात दिवसांपासून अन्नाविना उपासमार होत असल्याचा प्रकार समोर ...

परराज्यातील २९ ऊसतोडणी मजुरांचे आठवडाभर अन्नाविना हाल
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : मध्य प्रदेशातील २९ ऊसतोड कामगारांची सात दिवसांपासून अन्नाविना उपासमार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील सादोळा येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मुकादमामार्फत हे मजूर ऊसतोडणीचे काम करत होते. गेल्या तीन महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदारांनी या मजुरांकडून विनामोबदला काम करून घेतले. यात अल्पवयीन बालकांचाही समावेश आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांची दलाली करणारी टोळी या कामी सक्रिय असून, आर्थिक शोषण केले जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बबलू मिया, फिरोज खान, रफीक खान या तीन ऊसतोड ठेकेदारांनी याच जिल्ह्यातील २९ स्त्री-पुरुष ऊसतोडणी कामगारांना ४०० रुपये प्रतिदिन रोजाने ऊसतोडणीसाठी कायम केले. १३ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गणेश केंद्रे या ठेकेदारास मध्य प्रदेश -महाराष्ट्राच्या बॉर्डरवर या टोळ्या हवाली केल्या. यावेळी ऊसतोड कामगारांना तुमचे पैसे एक दोन आठवडे काम केल्यानंतर देण्यात येतील असे सांगण्यात आले.
विनामोबदला कष्टाचा प्रवास
गणेश केंद्रे या ठेकेदाराने २९ कामगारांना धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथील बापूसाहेब तिडके, हनुमान तिडके व केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बापू सेफ या मुकादमांच्या स्वाधीन केले. यावेळी या तीन मुकादमांनी २९ कामगारांचे तीन टोळ्यात रूपांतर केले. नंतर त्यांना १७ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे बागेवाडी कारखान्यात नेले. तेथे दोन महिने त्यांच्याकडून पैसे न देता काम करून घेण्यात आले. पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी कारखान्यात आणून काम घेण्यात आले. त्यानंतर माजलगाव तालुक्यातील सादोळा गावात १४ फेब्रुवारी २०२१ रोजी एका शेतकऱ्याच्या शेतात हे कामगार ऊसतोडणीचे काम करू लागले. यावेळी त्यांनी सतत तिडके, सेफ यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु मुकादमांनी आम्ही गणेश केंद्रेसोबत करार केल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला.
दोन्हीकडच्या ठेकेदारांकडून टोलवाटोलवी
या मजुरांनी गणेश केंद्रेस फोन लावून पैशाची मागणी केली. केंद्रे याने मी सर्व पैसे मध्य प्रदेशातील तुमच्या ठेकेदारास दिल्याचे सांगितले. मजुरांनी मध्य प्रदेशातील त्या तीन ठेकेदारांकडे पैसे मागितले तर तुमचे सर्व पैसे केंद्रेकडे दिल्याचे सांगितले. अशा पद्धतीने टोलवाटोलवी करत गेल्या तीन महिन्यांपासून पैसे न देता या २९ मजुरांकडून काम करून घेतले जात होते. त्यामुळे मजुरांनी ७ मार्चपासून काम करणे बंद केले आहे. काम बंद केल्याने मुकादमाने त्यांचे राशन बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सत्यभामा सौंदरमल यांनी दिला मजुरांना आश्रय
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या निदर्शनास ही बाब येतातच त्यांनी या २९ ऊसतोडणी कामगार स्त्री-पुरुषांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच सर्वतोपरी त्यांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळवून देण्याच्या त्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल संबंधित जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेस त्या लागल्या आहेत.
===Photopath===
130321\purusttam karva_img-20210313-wa0034_14.jpg~130321\purusttam karva_img-20210313-wa0033_14.jpg
===Caption===
माजलगाव ेथे मध्य प्रदेशातील २९ स्त्री- पुरूष ऊस तोडणी मजुरांचे शोषण केल्याचा प्रकार उघहकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल यांनी या मजुरांना आश्रय देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था कली.