मस्साजोग प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करू: नवनीत काँवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:55 IST2024-12-23T18:55:33+5:302024-12-23T18:55:48+5:30
तपास, उणिवांचा बारकाईने अभ्यास सुरू

मस्साजोग प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करू: नवनीत काँवत
बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत काय तपास झाला आहे; तांत्रिक बाबींचा काय तपास झाला व काय उणिवा राहिल्या आहेत, याचा बारकाईने अभ्यास मी सुरू केला आहे. या प्रकरणाचा प्राधान्याने तपास करून उर्वरित ज्या आरोपींना अटक करावयाची आहे, त्यांचाही लवकरात लवकर शोध घेऊन त्यांनाही अटक करू, अशी ग्वाही नूतन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मस्साजोग प्रकरणानंतर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी शासनाने छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हेगारी, नशेखोरीचा बीमोड करणारे, तांत्रिक तपासात हातखंडा असलेले पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांची बीडचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली. शनिवारी रात्री १०:४० वाजता त्यांनी पदभार घेतला.
बीड शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन तत्परतेने काम करील. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलिस प्रशासनातून कोणी कुचराई केली तरीही त्याला त्याचे परिणाम भाेगावे लागतील. जिल्ह्यातील जनतेची सुरक्षा हेच पोलिस प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकही आम्हाला सहकार्य करतील. पोलिस प्रशासन आपल्यासाठी सदैव तत्पर राहील, कायदा हातात घेऊ नका, असेही ते म्हणाले.
पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणीही अडथळा निर्माण करत असेल तर तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा, घटना छोटी किंवा मोठी या बाबतीत वरिष्ठांना त्या घटनेची तातडीने कल्पना देण्यात यावी. कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्यांची दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिल्या.
पहिल्याच दिवशी भेटले दिव्यांगांचे शिष्टमंडळ
दोन दिवसांपूर्वी परळी येथे एका दिव्यांगाने जेवण मागितल्याने हॉटेलचालकाने त्याला मारहाण केली होती. मात्र, या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अपंग प्रहार संघटनेतील दिव्यांग-अपंगाच्या शिष्टमंडळाने नवे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. अधीक्षकांनी त्यांचे निवेदन स्वीकारून अपंग व्यक्तीला झालेल्या मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ मागविला. या प्रकरणात परळी पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश यावेळी दिले.