प्रमोद महाजनांची हत्या 'पैशाच्या लोभातून' की 'मान-अपमानाच्या लढाईतून'? १९ वर्षांनंतरही वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:58 IST2025-10-28T11:56:22+5:302025-10-28T11:58:45+5:30
प्रकाश महाजन विरुद्ध सारंगी महाजन: १९ वर्षांनंतरही प्रमोद महाजन हत्या प्रकरणाच्या कारणावरून कुटुंबात तीव्र वाद

प्रमोद महाजनांची हत्या 'पैशाच्या लोभातून' की 'मान-अपमानाच्या लढाईतून'? १९ वर्षांनंतरही वाद
बीड : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या २००६ मधील हत्येचे प्रकरण तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा कुटुंबातील वादांमुळे चर्चेत आले आहे. प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी हत्येचे कारण ‘पैशाचा लोभ’ असल्याचे सांगत, हत्या करणारे प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना सारंगी महाजन यांनी ‘मान-अपमानाची लढाई’ हे हत्येचे खरे कारण असल्याचे सांगत, पलटवार केला आहे.
प्रकाश महाजन यांनी दावा केला की, प्रमोद महाजन यांची हत्या केवळ ‘ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी आणि पैशासाठी’ झाली. प्रवीण महाजन यांना काहीही काम न करता पैसा हवा होता आणि त्यासाठीच त्यांनी भाऊ प्रमोद महाजनांवर गोळी झाडली, अशी टीका त्यांनी केली. यावर सारंगी महाजन यांनी पलटवार करत प्रकाश महाजन यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. हत्येमागील खरे कारण ‘मान-अपमानाची लढाई’ हे होते. महाजन आणि मुंडे या दोन्ही परिवारांतील ‘पैसेवाले’ सदस्य प्रवीण महाजन (आणि प्रकाश महाजन यांचाही) अपमान करत होते, ज्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले. “आमच्या घरातलंच निस्तरता आलं नाही त्यांना, आमच्या घराला ते सावरू शकले नाहीत, तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते?” असे म्हणत त्यांनी प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. तसेच केस लढविण्यासाठी लागलेला पैसा महाजन परिवारातून नाही, तर त्यांच्या माहेरून लागलेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायप्रविष्ट प्रकरणाची मर्यादा संपल्यावर त्या सत्य उघड करतील, असेही त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे राजकारणात ‘बिघडलेली मुलगी’
गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराच्या वादात प्रकाश महाजन हे पंकजा मुंडेंच्या बाजूने बोलत आहेत, कारण ते त्यांचे मामा आहेत. मात्र, सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंवर पुन्हा टीका करत, “ती राजकारणात बिघडलेली मुलगी आहे... मी व्यक्तिशः कोणावरच आरोप केलेला नाहीये,” असे स्पष्ट केले. मुंडे कुटुंबासोबत त्यांचे आता संबंध नाहीत, कारण ते खूप ‘सेव्हन स्टार लाइफस्टाइलचे’ झाले आहेत आणि त्या भेटायला गेल्या तर ‘यांना पैशाची गरज आहे,’ असे आरोप होतील, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडेंच्या साक्षीचा संबंध नाही
गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजनांविरुद्ध साक्ष दिल्यामुळे आपण बदनामी करत असल्याचा आरोप चुकीचा आहे. कोर्ट केस आणि वारसा हक्काचा मुद्दा यांचा कोणताही संबंध नाही, असेही सारंगी महाजन यांनी स्पष्ट केले.