अवकाळी पावसामुळे गरमीत दिलासा; आंब्याला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:58 IST2019-03-26T00:57:40+5:302019-03-26T00:58:01+5:30
बीड : सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परळीत ...

अवकाळी पावसामुळे गरमीत दिलासा; आंब्याला फटका
बीड : सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परळीत विजेचा कडकडाट होत असतानाच जोरदार वारे वाहत होते. माजलगावात ढगाळ वातावरण होते, तर बीड परिसरातही सौम्य स्वरुपाचा अवकाळी पाऊस झाला. पोलीस मुख्यालय परिसरातील झाडावर वीज कोसळली, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच धारुर तालुक्यातील गावंदरा, आंबेवडगाव, उपळी परिसरात अवकाळी पाऊस बरसला. पाटोदा शहर आणि परिसरासह तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला.
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच वीज खंडित झाल्याने दिवसभर काहिली होत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार हवा, विजांचा हलकासा कडकडाट झाला. पावसाच्या सरी कोसळल्या. काही काळ पूर्ण पावसाळी वातावरण तयार झाले होते.
अंबाजोगाईत २० मिनिटे कडकडाटासह पाऊस
सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस वीस मिनिटे पडला. विजेचा कडकडाट सुरु होताच संपूर्ण शहरातील वीजपुरवठा बंद पडला. अंबाजोगाई शहर व परिसरात हा पाऊस सर्वत्र झाल्याने आंब्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा मिळाला.