कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:14 IST2025-01-13T05:13:57+5:302025-01-13T05:14:55+5:30
सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल.

कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार
बीड : खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार, हे ठरणार आहे. सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल.
२९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत गेल्या तेरा दिवसांपासून त्याची चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड याला मंगळवारी मकर संक्रांतीला न्यायालयात हजर करणार आहे.
दररोज दोन तास चौकशी
वाल्मीक कराड याची खंडणी प्रकरणात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तेरा दिवसांपासून दररोज दोन तास चौकशी केली.
उर्वरित २२ तास कराड यास शहर बीड पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद करून ठेवले
जात होते.
पोलिस अधिकाऱ्याची २४ तास ड्यूटी
वाल्मीक कराड याला बीड शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी सीआयडीचे दोन अधिकारी कायम तैनात आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील दररोज एका अधिकाऱ्याला २४ तास ड्यूटी लावण्यात आली आहे.