वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 06:22 IST2025-01-16T06:17:42+5:302025-01-16T06:22:38+5:30
सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते.

वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद
बीड : वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी बीड न्यायालयात हजर केले. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. खोटे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी परळीत दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला. अनेक समर्थक टॉवरवर चढून आंदोलनही केले.
न्या. सुरेखा पाटील यांच्यासमोर दुपारी सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते.
ॲड. कोल्हे यांनी या गुन्ह्यात कराडचा कसा सहभाग आहे, फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन, सीडीआर तपासायचे आहेत, अशा प्रकारचे १० मुद्दे मांडून १० दिवसांची काेठडी मागितली. तर, कराडचे वकील ॲड. ठोंबरे यांनी या हत्येच्या गुन्ह्यात कराडचा संबंध नाही. अगोदरच १५ दिवस कोठडी घेतलेली. आता परत त्याच प्रश्नांवर काेठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितली. न्या. पाटील यांनी दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यावर २२ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बीड-परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या एकसदस्यीय चौकशी समितीमार्फत होईल. तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. एल. आचलिया यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली. या दोन्ही समितींना कोणाही व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्याचे अधिकार असतील. न्या. आचलिया समिती परभणीत घडलेला हिंसाचाराचीही चौकशी करणार आहे.
मागच्या दाराने नेले
बीड न्यायालयाबाहेर कराड समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हे पाहून पोलिसांनी समोर बंदोबस्त लावला, तर न्यायालयाच्या मागील दाराने कराडला तिसऱ्या मजल्यावरील मकोका न्यायालयात नेले. त्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने खाली आणून पोलिस व्हॅनमधून बीड शहर ठाण्याच्या कोठडीत नेले.
वकिलाची घोषणाबाजी
कराड याला न्यायालयातून बाहेर नेत असताना, ॲड. हेमा पिंपळे यांच्यासह इतर महिलांनी घोषणाबाजी करत कराडला फाशी देण्याची मागणी केली. यानंतर कराड समर्थकही आक्रमक झाले. अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.