आवाजाचा नमुना घ्यायचा; सुदर्शन घुलेला पुन्हा पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:26 IST2025-02-13T19:26:03+5:302025-02-13T19:26:09+5:30
सीआयडीकडून खंडणीच्या गुन्ह्याचा तपास

आवाजाचा नमुना घ्यायचा; सुदर्शन घुलेला पुन्हा पोलिस कोठडी
बीड : पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची आता तीन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. त्याचा आवाजाचा नमुना घेण्यासाठी सीआयडीने ही कोठडी मागितली आहे. बुधवारी त्याला केज न्यायालयात हजर केले होते.
केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. यामध्ये वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरोधात केज ठाण्यात ११ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात आतापर्यंत कराड आणि चाटे यांची पोलिस कोठडी घेऊन आवाजाचा नमुना घेण्यात आला होता; परंतु सुदर्शन घुलेला आता पहिल्यांदाच खंडणीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी घेण्यासाठी बुधवारी केज न्यायालयात हजर केले होते. यामध्ये त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. घुलेच्या आवाजाचा नमुना तर घेतलाच जाणार आहे, शिवाय इतरही काही महत्त्वाची माहिती त्याच्याकडून मिळण्याची शक्यता असल्याचे सीआयडीतील सूत्रांनी सांगितले. सध्या कराड आणि चाटे हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
कराड, चाटेच्या अहवालाची प्रतीक्षा
विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड हा अधिकाऱ्याला बोलला होता. याची रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली होती. त्यामुळे या दोघांचेही आवाजाचे नमुने यापूर्वी घेतले होते. आता घुलेचा आवाजाचा नमुना घेण्यासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे, तर या आगोदर पाठविलेल्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा सीआयडीला आहे.