बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच मोबाइल जप्त केले आहेत. हे सर्व मोबाइल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत; परंतु विष्णू चाटे याने अद्यापही ‘सीआयडी’ला मोबाइल दिलेला नाही. फरार असताना नाशिकमध्ये मोबाइल फेकून दिला, तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचे तो ‘सीआयडी’ला सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यातील कृष्णा आंधळे हा अजूनही मोकाटच आहे.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह दोन कोटी रुपयांची खंडणी आणि मारहाण व ॲट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहे. हत्या प्रकरणात सात आरोपी अटकेत असून, कृष्णा आंधळे ९ डिसेंबर २०२४ पासून मोकाटच आहे. सीआयडीला या तीनही गुन्ह्यांतील एकही आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. सर्व आरोपी हे बीड पोलिसांनीच पकडून दिलेले आहेत. तर तपासाबाबतही सीआयडी प्रचंड गोपनीयता बाळगून आहे.
कोयत्यासह वायर जप्तसंतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता, वायर, काठी असे हत्यारे जप्त केली आहेत. तसेच पाच मोबाइलही जप्त केले आहेत. यातील दोन मोबाइल हे जयराम चाटे आणि महेश केदार यांचे आहेत, तर उर्वरित तीन मोबाइल कोणाचे आहेत, याचा तपास करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत.
कृष्णा सराईत, चहावर काढतो दिवसकृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. अशाच प्रकारे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तो यापूर्वीही फरार होता. जेवणाऐवजी तो चहा, बिस्कीटवरही दिवस काढतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्याकडील पैसे संपले तरी तो लवकर शरण येणार नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सरपंच हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली होती. त्यांच्याकडून चौकशीही सुरू झाली; परंतु यातील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे फाेटो खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत दिसले. त्यामुळे सत्ताधारी, विरोधकांनी आवाज उठविला. त्यामुळेच आता ही एसआयटी बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांच्या जागी सीआयडीचेच वरिष्ठ अधिकारी घेण्यात येणार आहेत. तेली मात्र अध्यक्ष कायम राहणार असल्याचे समजते. सोमवार, मंगळवारी याबाबतचा आदेश निघू शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
न्यायालयाने ओढले ताशेरेविष्णू चाटेकडून त्याचा मोबाइल हस्तगत करण्यासह हा गुन्हा संघटित गुन्ह्याचा भाग असल्यामुळे सर्व आरोपीना एकत्र बसवून चौकशी करायची आहे. इतर प्रकारचाही तपास करण्यासाठी त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी केला. त्याला आरोपीचे वकील ॲड. राहुल मुंडे यांनी आक्षेप घेतला. २५ दिवसांपासून आरोपी कोठडीत असताना तपास अधिकाऱ्यांनी कोणता तपास केला? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. आरोपीचे पाच मोबाइल, तीन जीपसह सरपंच हत्येवेळी वापरण्यात आलेली सर्व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद ॲड. मुंडे यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी १९ दिवस तुमच्या ताब्यात आसताना त्याचा मोबाइल तपास अधिकाऱ्यांना हस्तगत करता आला नाही. मग काय केले? असे ताशेरे न्या. कुणाल जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर ओढले.
दोन्हीही गुन्ह्यांत मोबाइल महत्त्वाचा..!सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी आरोपींनी मारहाण करताना केलेले कॉल व व्हिडीओ कॉल विष्णू चाटेला केले आहेत का? व दोन कोटींच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाइलवरूनच दिली आहे का? यांचा तपास करण्यासाठी विष्णू चाटे यांचा मोबाइल हा दोन्हीही गुन्ह्यांत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा मोबाइल जप्त करण्यासाठी तपास अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत; परंतु खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटे तपासकामी सहकार्य करीत नसल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला होता.