खंडणी प्रकरणानंतर सरपंच देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला २ दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:23 IST2025-01-11T18:22:49+5:302025-01-11T18:23:38+5:30
आरोपी १९ दिवसांपासून ताब्यात असताना त्याचा मोबाईल तपास अधिकाऱ्यांना हस्तगत करता आला नाही; न्यायालयाचे ताशेरे

खंडणी प्रकरणानंतर सरपंच देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला २ दिवसांची पोलीस कोठडी
केज ( बीड) : खंडणीच्या गुन्ह्यात शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या विष्णू चाटेला सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात पोलिसांनी पुन्हा अटक केली. शनिवारी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश कुणाल जाधव यांनी त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी दुपारी 12:25 वाजता विष्णू चाटे याला केज येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी न्यायालयीन कामकाजाची पूर्तता करण्यात आल्या नंतर त्याला 1: 18 वाजता केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात त्याला आणण्यात आले. 1:30 वाजता प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाला प्रारंभ झाला. यावेळी सरकारी वकील अॅड बाळासाहेब कोल्हे यांनी आणखीन काही तपास करणे असल्यामुळे विष्णू चाटेला 8 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.त्याला आरोपीचे वकील अॅड राहुल मुंडे यांनी आक्षेप नोंदविला व यापुढे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव यांनी विष्णू चाटेला सोमवारपर्यंत दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
न्यायालयाचे ताशेरे..!
विष्णू चाटेकडून त्याचा मोबाईल हस्तगत करण्यासह , हा गुन्हा संघटित गुन्ह्याचा भाग असल्यामुळे सर्व आरोपींना एकत्र बसवून चौकशी करायची आहे. व इतर प्रकारचाही तपास करण्यासाठी त्याला 8 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी. असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी केला. त्याला आरोपीचे वकील अॅड. राहुल मुंडे यांनी आक्षेप घेतला 25 दिवसापासून आरोपी पोलीस कोठडीत असताना तपास अधिकाऱ्यांनी कोणता तपास केला? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून, या प्रकारणातील जवळपास सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत, आरोपीचे 5 मोबाईल,3 जीप सह, सरपंच हत्येवेळी वापरण्यात असलेली सर्व हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद अॅड. राहुल मुंडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी 19 दिवस तुमच्या ताब्यात असताना त्याचा मोबाईल तपास अधिकाऱ्यांना हस्तगत करता आला नाही. मग काय केले.? असे ताशेरे न्यायाधीश कुणाल जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर ओढले. व विष्णू चाटे याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दोन्हीही गुन्ह्यात मोबाईल महत्वाचा..!
सरपंच संतोष देशमुख हत्ये वेळी आरोपीनी मारहाण करताना केलेले कॉल व व्हिडिओ कॉल विष्णू चाटेला केले आहेत का? व 2 कोटीच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाईल वरूनच दिली आहे का? यांचा तपास करण्यासाठी विष्णू चाटे यांचा मोबाईल हा दोन्हीही गुन्ह्यात महत्वाचा असल्यामुळे हा मोबाईल जप्त करण्यासाठी तपास अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत. परंतु खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटे तपास कामी सहकार्य करीत नसल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला होता. हा मोबाईल सापडल्यास अनेकांच्या अडचणी वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.