विष्णू चाटे, जयराम चाटेची चार तास चौकशी; केजनंतर एसआयटीने नेले बीडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:11 IST2025-01-09T18:10:14+5:302025-01-09T18:11:07+5:30

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याची चौकशी सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी करीत आहेत.

Vishnu Chate, Jayaram Chate questioned for four hours; After Kaij, SIT takes them to Beed | विष्णू चाटे, जयराम चाटेची चार तास चौकशी; केजनंतर एसआयटीने नेले बीडला

विष्णू चाटे, जयराम चाटेची चार तास चौकशी; केजनंतर एसआयटीने नेले बीडला

केज : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे (रा. मैंदवाडी) व अवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना धमकी दिल्याच्या आरोपातील विष्णू चाटे (रा. कौडगाव) या दोघांची एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केज पोलिस ठाण्यात चार तास चौकशी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याची चौकशी सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी करीत आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी अपहरण करून आरोपींनी त्यांची क्रूरपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली सध्या सहा आरोपी पोलिस कोठडीत आहेत. तर मस्साजोग शिवारातील अवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे पोलिस कोठडीत आहेत. केज न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याने त्याचा मोबाइल अद्याप तपासी अधिकाऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे त्याला सात दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी शासनाने नियुक्त केलेले सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी केली होती. त्यानंतर विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश मुख्य न्या. पावसकर यांनी दिले होते. दरम्यान, विष्णू चाटेकडील मोबाइलच्या शोधासाठी व इतर महत्त्वाच्या तपासासाठी विष्णू चाटे व जयराम चाटे या दोघांना बुधवारी दुपारी एक वाजता केज पोलिस ठाण्यात आणले होते. येथे तब्बल चार तास दोघांचीही चौकशी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाची झडती
खंडणीच्या आरोपाखाली पोलिस कोठडीतील विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असल्यामुळे तालुका संपर्क कार्यालयात या प्रकरणाचे काही धागेदोरे मिळतात का? किंवा विष्णू चाटे याचा मोबाइल हस्तगत करण्यासाठी या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. सव्वापाच वाजेदरम्यान या दोन्ही आरोपींना बीडकडे घेऊन एसआयटीचे अधिकारी गेले.

तीनही वाहने केज पोलिस ठाण्यात
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करताना वापरलेली काळ्या रंगाची जीप (एम एच-४४/ झेड-९३३३) तसेच वाल्मीक कराड याला पुणे येथील पाषाण भागातील सीआयडीच्या कार्यालयात घेऊन जाण्यासाठी वापरलेली शिवलिंग मोराळे यांची पांढऱ्या रंगाची जीप (एम. एच.- २३- बी. जी. २२३१) आणि विष्णू चाटे याची पांढऱ्या रंगाची जीप असे तीन वाहन पोलिसांनी जप्त केलेले आहेत. ही वाहने केज पोलिस ठाण्याच्या परिसरात ठेवली आहेत.

Web Title: Vishnu Chate, Jayaram Chate questioned for four hours; After Kaij, SIT takes them to Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.