कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:33 IST2025-05-27T11:32:52+5:302025-05-27T11:33:14+5:30
बीडचे जेलर बक्सर मुलाणी यांची बीडहून लातूरला तडकाफडकी बदली

कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली
बीड : संताेष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात बुधवार, शुक्रवारी चिकन, फरसाण आणि इतर व्हीआयपी सोयीसुविधा दिल्या जात असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत बीडचे जेलर बक्सर मुलाणी यांची बीडहून लातूरला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आता राजाराम चांदणे हे बीडचे नवे जेलर असणार आहेत. ते रत्नागिरीहून येणार आहेत.
बीडच्या सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांना सेवेतून बडतर्फ केले होते. त्यांच्यावर फसवणूक, ॲट्रॉसिटीसह निवडणूक विभागाचा, असे चार गुन्हे दाखल आहेत. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर येताच शनिवारी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कराडला बीडच्या कारागृहात अनेक सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप केला.
बीडचे कारागृह चर्चेत
वाल्मीक कराड जेलमध्ये गेल्यापासून बीडचे कारागृह चर्चेत आले होते. व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासह आत गेल्यावर काही कर्मचारी त्याला सहकार्य करत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सुदर्शन घुले, बबन गित्ते गँग आदींचा वादही झाला होता. त्यानंतर आता कासले जेलमधून बाहेर येताच त्यांनी नवीन आरोप केले होते. त्यामुळे बीडचे जेल पुन्हा चर्चेत आले आहे.