विनायकची यशोगाथा, यू-ट्युबवरील अभ्यासक्रम पाहून नीटमध्ये 595 गुण; आईने घरकाम करून दिला आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 11:31 IST2022-09-09T11:30:32+5:302022-09-09T11:31:29+5:30
विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशीचा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे.

विनायकची यशोगाथा, यू-ट्युबवरील अभ्यासक्रम पाहून नीटमध्ये 595 गुण; आईने घरकाम करून दिला आधार
अविनाश मुडेगावकर -
अंबाजोगाई (जि. बीड) : कसल्याही भौतिक सुविधा नाहीत. ना शिकवणी, ना कसला आधार. केवळ यू-ट्युबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडिओ पाहून विनायक अर्जुन भोसले याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत. अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही, याचा प्रत्यय विनायक भोसले याने समाजासमोर ठेवला आहे.
परळी तालुक्यातील सेलू येथील विनायक अर्जुन भोसले याच्या वडिलांचे २०१४मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुणी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. तिथे त्यांनी धुणी-भांडी करण्याचे काम सुरू केले. छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चार जणांचे कुटुंब राहते. याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात.
विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशीचा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे.
मात्र, अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली. नीटच्या शिकवणीची फी भरू शकत नसल्याने त्याने यू-ट्यूबवर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहून मेहनतीने अभ्यास केला व नीटच्या परीक्षेत ५९५ गुण
प्राप्त केले.