तहसिलदांराची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 13:36 IST2021-10-11T13:35:03+5:302021-10-11T13:36:11+5:30
कामात पारदर्शकता आल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळत असल्याची भावना येथील नागरिकांची आहे.

तहसिलदांराची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
कडा ( बीड ) : तहसीलदार राजाभाऊ कदम यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी नागरिकांनी सकाळी ११ वाजता नगर-जामखेड-बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
राजाभाऊ कदम हे मागील वर्षापासून आष्टी तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कामात पारदर्शकता आल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळत असल्याची भावना येथील नागरिकांची आहे. दरम्यान, तहसीलदार कदम यांची नुकतीच आष्टी येथून देगलूर येथे बदली करण्यात आली आहे. बदली रद्द् करण्यासाठी टाकळी अमिया, रूईनालकोल, सराटेवडगांव, कडा येथील नागरिकांनी रास्तारोको केला. या आंदोलनात अनिल ढोबळे, प्रा. राम बोडखे, सावता ससाणे, संजय नालकोल, रहेमान सय्यद, किशोर घोडके, बाबासाहेब शिरोळे, विष्णु निंबाळकर आदी ग्रामस्थ सहभागी होते.
यावेळी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, बंडु दुधाळ, मंगेश मिसाळ, मंडळ अधिकारी प्रियंका घोडके, तलाठी नवनाथ औदकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला. यावेळी टाकळी अमिया रस्ता येथे पहिली ते पदवी असे महाविद्यालय सुरू करावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.