संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्याची ऐतिहासिक जावयाची गदर्भ सवारी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:02 IST2025-03-12T12:01:22+5:302025-03-12T12:02:23+5:30
विडा येथे गदर्भ सवारीची शतकोत्तर परंपरा अखंड चालू असून, पाच दिवस अगोदर जावई शोधण्यासाठी ग्रामस्थ गावोगावी फिरतात.

संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्याची ऐतिहासिक जावयाची गदर्भ सवारी रद्द
विडा (बीड) : केज तालुक्यातील विडा येथे मागील १०० वर्षांपासून धूलिवंदनाच्या दिवशी जावयाच्या गदर्भ सवारीची परंपरा सुरू आहे. मात्र, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्याने यावर्षी गदर्भ सवारी होणार नाही, असे सरपंच सूरज पटाईत यांनी स्पष्ट केले.
विडा येथे गदर्भ सवारीची शतकोत्तर परंपरा अखंड चालू असून, पाच दिवस अगोदर जावई शोधण्यासाठी ग्रामस्थ गावोगावी फिरतात. पकडून आणलेल्या जावयाला नजरकैदेत ठेवून धूलिवंदनाच्या दिवशी गाढवाच्या गळ्यात चप्पल-बुटाची माळ घालून गावभर ढोल-ताशांच्या गजरात गावभर मिरवले जाते. नंतर मारुती मंदिराच्या पारावर मिरवणूक विसर्जित करून जावयाला गावकऱ्यांच्या वतीने कपड्याचा आहेर व सासऱ्याकडून पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली जाते.
मात्र, यावर्षी शेजारील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानवी हत्या केल्याने यावर्षी गदर्भ सवारी व जावयाची मिरवणूक हा उत्सव विडा येथील ग्रामस्थ साजरा करणार नाहीत, असे निवेदन माजी उपसरपंच बी. आर. देशमुख, बाळू पटाईत, उत्तम देशमुख, बाबू काळे, खमरू कुरेशी व ग्रामस्थांनी सरपंच सूरज पटाईत यांना ११ मार्च रोजी दिले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे विडा येथील गदर्भ सवारीची परंपरा यावर्षी खंडित करण्यात आली असून, पुढील वर्षी ही परंपरा पुन्हा सुरळीतपणे चालू राहील, असे विड्याचे सरपंच सूरज पटाईत यांनी सांगितले.