ढाब्यावर जेवण, मग शरण, वाल्मीक कराडचे सीसीटीव्ही ऑडिओ क्लिप व्हायरल, जामीन अर्जही घेतला मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:10 IST2025-01-24T11:09:52+5:302025-01-24T11:10:16+5:30
Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या व दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड हा शरण येण्याच्या आदल्या दिवशी बीड तालुक्यातील मांजरसुंब्यातील ढाब्यावर जेवला.

ढाब्यावर जेवण, मग शरण, वाल्मीक कराडचे सीसीटीव्ही ऑडिओ क्लिप व्हायरल, जामीन अर्जही घेतला मागे
बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या व दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड हा शरण येण्याच्या आदल्या दिवशी बीड तालुक्यातील मांजरसुंब्यातील ढाब्यावर जेवला. त्यानंतर आलिशान कारमधून पुण्याला गेला आणि तेथे ३१ डिसेंबर २०२४ रोजी शरण आला. आदल्या दिवशीचे रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला खंडणीच्या गुन्ह्यात दाखल केलेला कराडचा जामीन अर्जही बिनशर्त मागे घेण्यात आला आहे.
याआधी कराडसह सर्वच आरोपी हे विष्णू चाटे याच्या कार्यालयात एकत्रित आल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाक्यावरील आणि एका पेट्रोल पंपावरील कथित सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. हे फुटेज ३० डिसेंबर २०२४ रोजीचे असल्याचे सांगण्यात येत असून दुसऱ्याच दिवशी तो पुण्यात सीआयडीला शरण आला होता. कराडला फरार असताना जिल्ह्यातील कोणी कोणी मदत केली, याची माहिती सीआयडी घेत आहे.
आठवले याला सहकार्य करा
वाल्मीक कराड याची कथित ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. यात तो बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्याशी संवाद साधत आहे. सनी आठवले याला सहकार्य करा, असे संभाषण यात आहे. आठवले यानेच ही क्लीप सोशल मीडियावर अपलोड केली आहे. परंतु, या क्लीपशी आपला काहीही संबंध नाही. सनी हा बनावट नोटा आणि गोळीबार प्रकरणात फरार आहे. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी तो असे प्रकार करत असल्याचे बल्लाळ म्हणाले.
सराईत गुन्हेगार
सरकारी वकिल जितेंद्र शिंदे यांनी से मध्ये कराड हा सराईत गुन्हेगार असून त्याला राजकीय वलय आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी बाजू मांडली. कराडचे वकील अशोक कवडे यांनी त्याला जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज मागे घेतला.
कराडच्या पाेटात दुखले, रुग्णालयात दाखल केले
बुधवारी मध्यरात्री वाल्मीक कराड याच्या पोटात दुखायला लागले. बीड कारागृहातून त्याला जिल्हा रुग्णालयात १२:४५ वाजता दाखल केले. पोटाची सोनोग्राफी करण्यासह रक्त व इतर तपासण्या केल्या.
यात त्याला लघवीचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला. कराड हा गुरुवारी दुपारपर्यंत मिनी आयसीयूमध्ये उपचार घेत होता. वॉर्डच्या बाहेर तगडा बंदोबस्त तैनात होता. उपचार सुरू असल्याची माहिती प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी दिली.
धागेदोरे का मिळत नाहीत? धनंजय देशमुख यांचा प्रश्न
जे व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज मीडियाच्या हाती लागतात ते तपास करणाऱ्यांच्या हाती का लागत नाहीत, असा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच तपासाची माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.