वाल्मीक कराडने सुनावणीआधीच मागे घेतला जामीन अर्ज; तब्येतही बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:47 IST2025-01-23T15:47:24+5:302025-01-23T15:47:53+5:30
जामीन अर्जावर केज न्यायालयासमोर सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलांकडून जामीन अर्ज मागे घेण्यात आला.

वाल्मीक कराडने सुनावणीआधीच मागे घेतला जामीन अर्ज; तब्येतही बिघडली
Walmik Karad: पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या अर्जावर आज सुनावणी होण्याआधीच कराड याने आपला अर्ज मागे घेतला. जामीन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता असल्यानेच कराडच्या वकिलांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर तुरुंगाबाहेर येण्यासाठी वाल्मीक कराड याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र नंतर कराड याचा सरपंच खून प्रकरणातही संबंध आढळून आला आणि त्याच्यावर हत्येसह मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वाल्मीक कराडचा पाय खोलात गेला असतानाच त्याला जामीन मिळण्याची शक्यताही मावळली. या पार्श्वभूमीवर आज खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर केज न्यायालयासमोर सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलांकडून जामीन अर्ज मागे घेण्यात आला.
दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या कराडची प्रकृती खालावल्याने काल रात्री त्याला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.
पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग आढळल्याने वाल्मीक कराडवर हत्येसह मकोकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं असता कराड याला सुरुवातीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र काल ही पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं. प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलीस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीची मागणी न करण्यात आल्याने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
खंडणी प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा समोर
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला २ कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी हे २९ नोव्हेंबरला २०२४ ला केज येथील विष्णू चाटे याच्या संपर्क कार्यालयात सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी एकत्रितपणे आत जाताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यापाठोपाठ ११ वाजून २७ मिनिटांना पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील त्याच कार्यालयात गेले, असे हे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच सर्वत्र व्हायरल झाले. खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांसह सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सर्वजण एकत्रित या कार्यालयात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज म्हणजे वाल्मीक कराड टोळीच्या विरोधातील सर्वांत मोठा पुरावा मानला जात आहे.