वाल्मीक कराडवर १४ गुन्हे, तरीही ‘लाडकी बहीण’चा अध्यक्ष! परळीतील पदावर अजूनही कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:59 IST2025-01-09T13:58:17+5:302025-01-09T13:59:53+5:30

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीमध्ये कोण आहेत? वाचा सविस्तर

Valmik Karad has 14 crimes against him yet he remains the president of 'Ladki Bhain'! He still holds the post in Parli | वाल्मीक कराडवर १४ गुन्हे, तरीही ‘लाडकी बहीण’चा अध्यक्ष! परळीतील पदावर अजूनही कायम

वाल्मीक कराडवर १४ गुन्हे, तरीही ‘लाडकी बहीण’चा अध्यक्ष! परळीतील पदावर अजूनही कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मीक कराड कायम आहे.  विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती. कराडवर १४ गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीचे कार्यालय आहे.  येथीलच एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली  होती.  याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मीक कराड याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सीआयडी पथक करीत आहे. कराड हा पुण्यात शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत.  

समितीमध्ये कोण आहेत?

तत्कालीन पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत एक समिती तयार केली. त्याप्रमाणे परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक कराड याची नियुक्ती केली होती. यासह इतर दोन अशासकीय सदस्य आणि काही अधिकारी, कर्मचारीही या समितीचे सदस्य आहेत.

समितीत बदल केला आहे का, याची विचारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संपर्क केला. परंतु, त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही. लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवरदेखील वाल्मीक कराड सदस्य आहे.

तपास सुरू

आरोपींची सीआयडी, एसआटीकडून  चौकशी केली जात आहे. कराडने यापूर्वी असे प्रकार केले का किंवा असे गुन्हे करण्यात त्याचे कोण साथीदार आहेत का? याचा तपासही केला जात आहे.

सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली १० लाख  शासकीय मदत

सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला दहा लाखांच्या शासकीय मदतीचा धनादेश प्रशासनातील  कर्मचाऱ्यांनी बुधवारी कुटुंबाला देण्यासाठी त्यांची घरी भेट घेतली. न्याय मिळेपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका कुटुंबाने घेतली. संविधान अवमान घटनेनंतरच्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना १५ डिसेंबरला झाली.

न्यायालयीन चौकशी करा : आंबेडकर

सूर्यवंशी यांचा मृत्यू  कोठडीत झाल्याने त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Web Title: Valmik Karad has 14 crimes against him yet he remains the president of 'Ladki Bhain'! He still holds the post in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.