माजलगावातील गॅस एजन्सीमधील तीनच डिलिव्हरी बॉयचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST2021-05-31T04:25:01+5:302021-05-31T04:25:01+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : कोरोना काळात सर्व काही बंद असले तरी गॅस सिलिंडर घरपोच डिलिव्हरी सुरू आहे. माजलगाव शहरात ...

माजलगावातील गॅस एजन्सीमधील तीनच डिलिव्हरी बॉयचे लसीकरण
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : कोरोना काळात सर्व काही बंद असले तरी गॅस सिलिंडर घरपोच डिलिव्हरी सुरू आहे. माजलगाव शहरात एक एजन्सी असून पात्रुड येथे ग्रामीणसाठी वेगळी गॅस एजन्सी आहे. माजलगाव येथील गॅस एजन्सीवर काम करणाऱ्या व डिलिव्हरी देणाऱ्या केवळ तीन जणांचेच लसीकरण केले असून पात्रुड येथील एजन्सीमधील एकानेही लसीकरण केले नसल्याचे उघड झाले आहे.
माजलगाव शहरातील गॅस एजन्सीच्या वतीने शहरासह अनेक खेड्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. या एजन्सीकडे ३८ हजार ग्राहक आहेत. या एजन्सीकडे १५ डिलिव्हरी बॉय, कार्यालयात काम करणारे ५ तर ५ गोडाऊनवर काम करणारे व वाॅचमन असे २५ कर्मचारी आहेत. तर तालुक्यातील पात्रुड येथे ग्रामीण भागासाठी अलेल्या गॅस एजन्सीकडे ५ डिलिव्हरी बॉय, कार्यालयात काम करणारे २, गोडाऊनवर काम करणारे व वाॅचमन असे एकूण ९ जण आहे. या एजन्सीकडे ५ हजार ५०० गॅसधारक आहेत. येथील एकाचेही लसीकरण अद्याप झाले नसल्याची बाब उघड झाली आहे.
दोन्ही एजन्सीकडे मिळून ४३ हजार ५०० गॅसधारक आहेत. या ग्राहकांपैकी जवळपास ७५ टक्के ग्राहकांना घरपोच सिलिंडरची डिलेव्हरी दिली जाते. तर २५ टक्के ग्राहक गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर जाऊन सिलिंडर आणत असतात. या सर्व ग्राहकांचा डिलिव्हरी बॉय, कार्यालयात काम करणारे कर्मचाऱ्यांशी संपर्क होती. घरपोच डिलिव्हरीसाठी आल्यावर घरातील रिकामे सिलिंडर देणे व भरलेले सिलिंडर घेण्यासाठी जास्त करून घरातील महिलाच हाताळणी करतात. त्याचबरोबर कार्डवर नोंद करून घेतली जाते. घरोघरी गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉय व कर्मचाऱ्यांचा गॅस कनेक्शनधारकांशी थेट संपर्क होत आहे. यामुळे कोरोना वाढीस प्रोत्साहन मिळत असताना लसीकरणाकडे मात्र ना पुरवठा विभागाचे लक्ष आहे ना गॅस एजन्सी मालकाचे.
माजलगाव शहर, ग्रामीणचे एकूण घरगुती गॅस ग्राहक - ४३,५००
गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी - २
घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - २०
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - ०२
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - ०१
एकही डोस न घेणारे कर्मचारी - १७
एकही पॉझिटिव्ह नाही
माजलगाव शहरात तसेच ग्रामीण भागात गॅस सिलिंडर घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बॉयपैकी माजलगाव व पात्रुड येथील एजन्सीमधील एकही कर्मचारी पॉझिटिव्ह आलेला नाही.
येथे सिलिंडर वाटप करणाऱ्या व कार्यालयातील एकही जण आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह आलेला नाही.
डिलिव्हरी बॉय म्हणतात...
१) मी सिलिंडर वाटप करत असताना वेळ काढून कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला २-३ वेळा गेलो होतो. परंतु मला लस मिळू शकली नाही. गर्दीमुळे तर कधी लस संपल्यामुळे रिकामे परतावे लागले. -- प्रकाश ढेरे, माजलगाव. २)
कोविडची लस घेण्यासाठी मी अनेक वेळा केंद्रावर गेलो होतो. पण गर्दीमुळे शहरात लस मिळू शकली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन पहिला डोस घेतला. दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. --- बाबासाहेब गोरे
लसीकरणाच्या सूचना
महाराष्ट्र शासनाने २८ मे रोजी एक पत्र काढून गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यबाबत प्रशासनाने संबंधित एजन्सीधारकांना कळविले आहे.
डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी.
सिलिंडर सॅनिटाईजबाबत अनभिज्ञ
घरात सिलिंडर आणल्यास त्याला सॅनिटाईज कसे करावे, याबाबत एजन्सी चालकाकडून एकाही ग्राहकास सोशल मीडियाद्वारे, पत्रकाद्वाद्वारे किंवा सिलिंडर देताना सांगितलेले नाही. त्यमुळे सिलिंडर सॅनिटाइजबाबत ग्राहक अनभिज्ञ आहेत. ना सिलिंडरला ना कार्डवर सॅनिटाईज केले जाते.
------------