दुर्दैवी ! शेततळ्यात बुडून दोन भावडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 20:06 IST2021-07-27T20:05:24+5:302021-07-27T20:06:00+5:30
केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील घटना

दुर्दैवी ! शेततळ्यात बुडून दोन भावडांचा मृत्यू
केज : तालुक्यातील लाडेवडगाव येथे आईवडिलांसोबत शेतात गेलेल्या दोन भावंडांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावावर शोककळा पडली आहे
केज तालुक्यातील लाडे वडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य असलेले माधव नामदेव लाड व त्यांची पत्नी व दोन मुलांसह दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुतारशेत येथे गेले होते. माधव हे म्हैस बांधायला जात असताना मुले हर्षद ( ७ ) व ओम ( ५) त्यांच्यामागे चालत आली. मात्र, ते म्हैस बांधायला पुढे गेल्यावर दोन्ही भांवडे शेजारच्या शेततळ्याकडे गेली. इथे पाय घसरल्याने दोन्ही भावंडे शेततळ्यात पडून बुडाली.
दरम्यान, पाठी मागे चालत असलेली दोन्ही मुले दिसत नसल्याने माधव यांनी शेतात काम करत असलेल्या पत्नीला मुले आली का असे विचारले. त्यांनी दोन्ही मुले आपल्याकडे आली नसल्याचे सांगितली. यानंतर माधव यांनी शेता शेजारच्या सुंदर बाप्पाजी लाड यांच्या शेतातील शेततळ्याकडे धाव घेतली. इथे पाण्यावर मुलाची चप्पल तरंगताना दिसून आली. पाण्यात मुलाचा शोध घेतला असता दोघांचे मृतदेह आढळून आली.