१३ वर्षीय पुतणीवर अत्याचारप्रकरणी चुलत्याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 20:00 IST2025-05-20T20:00:20+5:302025-05-20T20:00:46+5:30

या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पीडिता, फिर्यादी, डॉक्टर, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ व इतर एकूण १८ साक्षीदार तपासले.

uncle sentenced to life imprisonment until natural death for raping minor niece | १३ वर्षीय पुतणीवर अत्याचारप्रकरणी चुलत्याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा

१३ वर्षीय पुतणीवर अत्याचारप्रकरणी चुलत्याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा

बीड : पीडित अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोष सिद्ध झाल्याने चुलत्याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.-१ एस. आर. पाटील यांच्या न्यायालयाने सुनावली. ऑगस्ट २०२३ मध्ये पीडितेच्या पोटदुखीच्या आजारावरून तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पीडितेस पुढील तपासणीसाठी अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरकडे पाठविले असता या तपासणीत पीडिता ही सात महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पीडितेच्या आईने फिर्याद दिली.

१३ वर्षांच्या बालिकेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा अंभोरा ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील असल्याने तपासासाठी अंभोरा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय बी. सी. गोसावी, एपीआय डी. बी. कोळेकर, त्यानंतर सुरेखा एस. धस यांनी केला. तपासादरम्यान फिर्यादी व साक्षीदार तसेच वैद्यकीय पुरावा यावरून या प्रकरणातील आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आढळल्याने बीड येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अनिल बी. तिडके व जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय राख यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून हवालदार बी. बी. शिंदे, तसेच अंभोरा ठाण्याच्या माहिला पोलिस कर्मचारी एस. आर. जेव्हे यांनी सहकार्य केले.

१८ साक्षीदार तपासले
या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पीडिता, फिर्यादी, डॉक्टर, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ व इतर एकूण १८ साक्षीदार तपासले. या प्रकरणात पीडितेचा पुरावा, तसेच पीडितेबाबतचा वैद्यकीय पुरावा व प्रकरणातील डीएनए तपासणी अहवाल व इतर साक्षीदारांचा पुरावा, तसेच सहायक सरकारी वकील अनिल बी. तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या.-१ एस. आर. पाटील यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली.

अशी सुनावली शिक्षा
कलम ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (एन), ३७६ (३) भादंवि व कलम ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ नुसार दोषी ठरवून कलम ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ अन्वये आरोपीच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ भादंवि अन्वये सहा महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: uncle sentenced to life imprisonment until natural death for raping minor niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.