सुटयात मावशीकडे आलेल्या दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:41 IST2022-06-03T15:41:22+5:302022-06-03T15:41:46+5:30
माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील घटना

सुटयात मावशीकडे आलेल्या दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
माजलगाव (बीड) : तालुक्यातील महातपुरी येथे मावशीकडे गेवराई व परतूर तालुक्यातून आलेल्या दोन मावस बहिणींचा गोदावरी बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील दिपाली गंगाधर बरबडे ( 20 ) व आनंदगाव ( ता. परतुर ) येथील स्वाती अरुण चव्हाण ( 12 ) या मावस बहिणी माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील आपल्या मावशीकडे आल्या होत्या. मावशी आणि आईसोबत दोघीही गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी जात असत.
आज सकाळी स्वाती बंधाऱ्यात आंघोळ करत असताना पाण्यात बुडाली. हे पाहून तिला पकडण्यासाठी दिपालीने प्रयत्न केले. मात्र, दोघीही पाण्यात बुडाल्या. हे पाहून बंधाऱ्यावरील महिलांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. तोपर्यंत दोघी पाण्यात बुडाल्या होत्या. त्यांना सापडण्यासाठी जवळपास एक तास लागला. त्यांना बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून दोघींना मृत घोषित केले. त्यानंतर या ठिकाणी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या मृत्यू प्रकरणी लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.काँ. माणीक राठोड करत आहेत.