रक्ताने माखलेल्या दोन पोत्याने उडाली खळबळ; पोलिसांनी तासाभरात आणले सत्य समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:14 IST2020-08-17T13:09:54+5:302020-08-17T13:14:35+5:30
या घटनेने तब्बल तासभर पोलिसांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

रक्ताने माखलेल्या दोन पोत्याने उडाली खळबळ; पोलिसांनी तासाभरात आणले सत्य समोर
कडा (बीड ) : बेवारस अवस्थेत दोन पोते पुलाच्या खाली पडलेले आहेत. त्यातून रक्त बाहेर पडत असून काही तरी संशयास्पद आहे, असा फोन रविवारी सकाळी कडा पोलिसांना आला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन तत्परतेने त्या पोत्याबद्दलचे गूढ दूर केले. पोत्यात संशयास्पद काही आढळून आले नसल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, या घटनेने तब्बल तासभर पोलिसांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
आष्टी तालुक्यातील कडा डोंगरगण रोडवरील पुलाच्या खाली बेवारस दोन पोते आढळून आले. त्यावर रक्त दिसत असून दुर्गंधी येत असल्याची माहिती कडा पोलिसांना समजली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तब्बल तासाभराने पोलिसांनी पोत्यात संशयास्पद काही नसल्याचा उलगडा केला.
पोत्यात मेलेल्या जनावराचे मांस बांधून तळ्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सत्य पुढे येताच नागरिकांसह पोलिसांनी ही सुटकेचा निश्वास सोडला. सहायक पोलीस निरीक्षक सलिम पठाण, पोलीस नाईक बाबासाहेब गर्जे, संतोष नाईकवाडे, मंगेश मिसाळ, बंडू दुधाळ आदींनी या प्रकरणाचा उलगडा केला.