एटीएम सेंटरच्या नावाखाली शिक्षकाला दोन लाखांचा ऑनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 19:18 IST2020-11-07T19:17:16+5:302020-11-07T19:18:42+5:30
२५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९ यादरम्यान ही फसवणूक झाली.

एटीएम सेंटरच्या नावाखाली शिक्षकाला दोन लाखांचा ऑनलाईन गंडा
औरंगाबाद : एटीएम सेंटरसाठी दरमहा १५ हजार रुपये भाडे आणि १० लाख रुपये आगाऊ देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी १ लाख ९५ हजार ७२० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९ यादरम्यान ही फसवणूक झाली.
शिक्षक विलास रामराव गायकवाड (४७, रा. नक्षत्रवाडी) यांनी गुगलवर इंडिया वन एटीएमकरिता ऑनलाईन अर्ज केला होता. त्यावेळी त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, जागेची कागदपत्रे आणि वीज बिलाच्या झेरॉक्स प्रति पीडीएफस्वरूपात अपलोड केल्या होत्या. काही दिवसांनी त्यांना शर्मा नावाच्या व्यक्तीने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून त्यांचा अर्ज कंपनीने मंजूर केल्याचे सांगितले. कंपनीकडून त्यांना दरमहा १५ हजार रुपये भाडे आणि १० लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यात येईल, असेही कळविले.
यानंतर प्रवासभत्ता, विमा शुल्क, नाहरकत, स्वयंघोषणापत्र देण्याची वेगवेगळी कारणे सांगून गायकवाड यांच्याकडून टप्प्याटप्प्याने १ लाख ९५ हजार ७२० रुपये ऑनलाईन उकळले. आरोपीने दिलेल्या बँक खात्यात गायकवाड यांनी रक्कम जमा केली. एवढी मोठी रक्कम मिळाल्यावर आरोपींनी त्यांचे मोबाईल बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच गायकवाड यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे तपास करीत आहेत.