चंदनसावरगावजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 08:20 IST2025-02-01T08:19:21+5:302025-02-01T08:20:00+5:30

अपघातातील कार क्रमांक (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) यातील वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Two cars collide head-on near Chandansawargaon; Three killed, one seriously injured | चंदनसावरगावजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी

चंदनसावरगावजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी

दिंद्रुड (बीड)  : अंबाजोगाई-केज मार्गावरील चंदनसावरगाव नजीक शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये अमित दिलीपराव कोमटवार (वय ३५, रा. दिंद्रुड, माजलगाव), परमेश्वर नवनाथ काळे ( रा.खांडे पारगाव, बीड), गणपत नारायण गोरे( ४७, रा. सामनापुर ता. जि.बीड) यांचा समावेश आहे. 

अपघातातील कार क्रमांक (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) यातील वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परमेश्वर काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे हे गंभीर जखमी अवस्थेत होते. माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे अपघातस्थळी पोहोचले. पोलिसांनी परमेश्वर काळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमी अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे यांना आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अमित कोमटवार यांच्या कारमधील जखमी विष्णू धोतरे ( अंबाजोगाई) यास अधिक उपचारासाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे. तर दूसरा जखमी विनोद शिंदे आणि अविनाश कुराडे ( अंबाजोगाई) यांचायवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मयत अमित (विकी) कोमटवार हे दिंद्रुड येथील माजी सरपंच अजय कोमटवार यांचे बंधू होते. ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या अमित यांच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील-आई, दोन भाऊ असा परिवार आहे. अंत्यविधी दिद्रुड येथे कोमटवार यांच्या शेतात आज, शनिवारी ( दि. १) दुपारी ३ वाजता होणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे.

Web Title: Two cars collide head-on near Chandansawargaon; Three killed, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.