'तुम्ही लय माजलात'; खोक्या भोसलेच्या घरावर सशस्त्र हल्ला; पत्नीसह तिघी गंभीर जखमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:11 IST2025-10-13T14:07:19+5:302025-10-13T14:11:50+5:30
'झोपडी का टाकली?' विचारत रात्री ११ वाजता घरात घुसून महिलांना मारहाण; शिरुर तालुक्यातील झापेवाडी येथील घटना

'तुम्ही लय माजलात'; खोक्या भोसलेच्या घरावर सशस्त्र हल्ला; पत्नीसह तिघी गंभीर जखमी!
बीड: जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील झापेवाडी येथे शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सुमारे १५ जणांनी तीन महिलांवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमींमध्ये खोक्या भोसलेच्या पत्नीचा समावेश आहे. जखमी महिलांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात सतीश उर्फ खोक्या सतीश भोसले याची पत्नी तेजू हिच्यासह शीतल पाल्या चव्हाण आणि रविना काळे या महिला जखमी झाल्या आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तेजू भोसले याने दिलेल्या माहितीनुसार, झापेवाडी येथे घरी असताना १५ जणांनी हल्ला केला. 'तुम्ही येथे झोपडी (पाल) टाकून का राहता, पारध्यांनो तुम्ही लय माजलात', असे म्हणत मारहाण करण्यात आली आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्यामुळे भयभीत झालेल्या भोसले कुटुंबीयांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले. जखमी महिलांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.
'खोक्या भोसले' कोण?
सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले हा शिरुर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. तो भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर दहशत पसरवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तसेच, वनविभागाच्या झाडाझडतीमध्ये त्याच्या घरी शिकारीचे साहित्य सापडल्याने त्याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल आहे.
पोलिसांकडून तपास सुरू, जखमींचा जबाब प्रलंबित?
हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. शिरुर पोलिसांनी जखमी महिलांचा जबाब रविवारी दुपारपर्यंत घेतला नसल्याचे तेजू भोसले यांनी सांगितले. शिरूर पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी शिरुर ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कॉल न घेतल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.